देशाला महासत्ता बनवण्यासाठीचे पंतप्रधान मोदी यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे ! – नारायण राणे, खासदार, भाजप

भाजपच्या ‘सेवा सप्ताहा’स सिंधुदुर्गात प्रारंभ 

सावंतवाडी – ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत’, हे सांगतांना अभिमान वाटतो. मोदी यांनी सत्तेत येऊन ७ वर्षे पूर्ण केली. या कार्यकाळात त्यांचे कार्य अतुलनीय आहे. देशाला महासत्तेकडे नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. यापुढेही त्यांचे कार्य असेच चालू राहून त्यांच्या नेतृत्वाखाली देश महासत्ता बनोे, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळाला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भाजपच्या वतीने जिल्ह्यात ‘सेवा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सेवा सप्ताहानिमित्त कोरोनाच्या काळात तन, मन आणि धन अर्पण करून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करणार्‍यांचा सत्कार खासदार यांच्या हस्ते करण्यात आला.

कुडाळ येथे या सेवा सप्ताहानिमित्त भाजपच्या वतीने कोरोनाबाधित आणि तौक्ते चक्रीवादळग्रस्त अशा २०० जणांना वाफ घेण्याचे यंत्र देण्यात आले. तसेच वादळात विविध प्रकारे हानी झालेल्यांना सिमेंटचे पत्रे, ताडपत्री, गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आदींचे वाटप करण्यात येत आहे.