रुग्णालयातून गर्भपात आणि लैंगिक क्षमता वाढवणार्या गोळ्यांचा मुद्देमाल जप्त
वाशिम – जिल्ह्यातील कारंजा येथे रौशन क्लिनिक या नावाने चालू असलेल्या एस्.एम. सिद्दीकी या बोगस डॉक्टरच्या रुग्णालयावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी कारवाई केली आहे. या बोगस रुग्णालयातून गर्भपात करणार्या, लैंगिक क्षमता वाढवणार्या, तसेच स्टिरॉइड अशा गोळ्यांचा २० ते २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (या संधीसाधू बोगस डॉक्टरमुळे किती जणांचे जीव धोक्यात आले ? याचे सखोल अन्वेषण करून डॉक्टरवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
कारवाईच्या वेळी रुग्णालयातील २ रुग्णांवर अवैधरित्या उपचार चालू होते. एस्.एम. सिद्दीकी यांच्याकडे पदवी प्रमाणपत्राविषयी विचारणा केली असता कोणतेही नूतनीकरण नसलेले बोगस प्रमाणपत्र दाखवले, तसेच रुग्णालयात रुग्णांचे तपासणी अहवाल पाहिल्यास कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांवरही उपचार केले असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. कारंजा तालुक्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने बोगस डॉक्टर कोरोनासदृश लक्षणे असणार्या रुग्णांना कोरोना तपासणीविषयी सूचना न देता त्यांच्यावर अयोग्य पद्धतीने उपचार करत असल्यामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या तक्रारी प्रशासन आणि तालुकास्तरीय समितीस प्राप्त झाल्या होत्या.