धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे प्रकरण
सांगली, २९ मे (वार्ता.) – लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांच्या आई सोयराबाई आणि अष्टप्रधान मंडळींना ठार केले’, असे कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक पुरावा नसलेले खोटे लिखाण केले आहे. कुबेर यांनी समाज-जाती यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी राज्य सरकारने गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करून गिरीश कुबेर यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करावा, अशी मागणी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची अपकीर्ती केल्याच्या निषेधार्थ गिरीश कुबेर यांच्या विरोधात राजवाडा चौक येथे श्री संभाजी प्रतिष्ठानने जोरदार निदर्शने केली. त्या वेळी श्री. नितीन शिंदे यांनी ही मागणी केली.
या वेळी भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री. प्रसाद रिसवडे, सर्वश्री अमर पडळकर, अविनाश मोहिते, संतोष पाटील, राजू जाधव, प्रदीप निकम, तानाजी शिंदे, अमित सूर्यवंशी, संजय जाधव, अशोक पाटील, निखिल सावंत यांच्यासह भाजप, शिवसेना यांचे कार्यकर्ते, हिंदू एकता आंदोलनाचेे पदाधिकारी उपस्थित होते.