मागील पंधरवड्यात जळगाव जिल्ह्यात १ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. अंत्ययात्रेनंतर हा आकडा आणखी वाढल्यास त्याला उत्तरदायी कोण ?
जळगाव, २९ मे (वार्ता.) – येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेस सहस्रो लोकांची गर्दी जमली होती. कोरोनाकाळात इतक्या प्रमाणात लोक जमल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आदल्या दिवशीच पोलिसांनी एका विवाह समारंभात १०० हून अधिक लोक उपस्थित असल्याने संबंधितांकडून ५० सहस्र रुपयांचा दंड वसूूल केला होता; मात्र अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. (हा आहे पोलिसांचा दुटप्पीपणा ! – संपादक) अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांपैकी कुणीही मास्क घातलेला नव्हता.
नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंद !
याविरोधात नागरिकांनी सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. याविषयी जळगाव येथील समाजसेवक दीपक कुमार गुप्ता यांनी पुढाकार घेऊन ट्विटरद्वारे या घटनेची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. (याचा अर्थ नागरिकांनी जर आवाज उठवला नसता, तर पोलिसांनी गुन्हा नोंदवला नसता ! अशा कर्तव्यचुकार पोलिसांना सरकारने बडतर्फ केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे ! – संपादक)