८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे ‘गोलमेज परिषद’ घेण्याची घोषणा
मुंबई – कोरोनामुळे आतापर्यंत मराठा आरक्षणाविषयी मवाळ भूमिका घेतली; मात्र आता शासनाने आरक्षणाविषयीची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या दिनी म्हणजे ६ जून या दिवशी रायगडावरून आंदोलनाला प्रारंभ करू, अशी चेतावणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी २८ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाविषयी भूमिका घोषित करण्याविषयी छत्रपती संभाजीराजे यांनी मागील २ दिवसांत राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आदी नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी वरील भूमिका मांडली. मराठा आरक्षणासाठी ८ ऑगस्ट या दिवशी देहली येथे ‘गोलमेज परिषद’ घेणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी संभाजीराजे म्हणाले,
१. मुख्यमंत्र्यांनी तातडीने राज्यातील आमदार आणि खासदार यांना तातडीने पत्र लिहून मराठा आरक्षणाविषयी चर्चा करावी. ७० टक्के मराठा समाजासाठी एकत्र यावे, अन्यथा ‘या समाजाची मते नकोत’, असे घोषित करा.
२. मराठा आरक्षणावरील चर्चेसाठी राज्य सरकारने २ दिवसांचे अधिवेशन बोलवावे.
३. ‘सारथी योजने’चे सूत्रही महत्त्वाचे आहे. यासाठी शासनाने १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद करावी. अन्य मागासवर्गीय समाजाप्रमाणे मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ दिला जावा.
४. मराठा आरक्षणासाठी राज्यशासनाने पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण पुनर्विचार याचिका प्रविष्ट करावी.
५. मराठा आरक्षण मिळण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल ? हे सांगता येत नाही; मात्र शासनाच्या हातात आहेत, त्या गोष्टीविषयी तरी सरकारने निर्णय घ्यावा.
६. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करावे. मराठा समाजासाठी वेगळ्या समितीची स्थापना करावी. अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील गरिबांना उद्योग उभारणीसाठी साहाय्य करावे.