बुलढाणा – येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे चारचाकी वाहन जाळण्याचा प्रयत्न २ अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला. २६ मे या दिवशी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन अन्वेषणास प्रारंभ केला आहे. वाहन जाळण्यापूर्वी आरोपींनी परिसरातील वीज पुरवठा खंडित केला होता. संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली आहे.
आमदार संजय गायकवाड हे २६ मेच्या रात्री दीड वाजता मुंबई येथून घरी परत आले. त्यानंतर ३ वाजण्याच्या सुमारास २ अज्ञात व्यक्ती दुचाकीवरून आल्या. त्यांनी वाहनातील इंधनाच्या टाकीजवळील भाग पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी इतर वाहनेही उभी होती. त्यामुळे आगीचा भडका उडून मोठी हानी होण्याची शक्यता होती.