पैठण येथे बनावट आधुनिक वैद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाचे आक्रमण !

५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद ! 

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पैठण (जिल्हा संभाजीनगर) – येथील बालानगर येथे बनावट आधुनिक वैद्य अरबिंदो बिस्वास यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावाने आक्रमण केले. या पथकाची बनावट आधुनिक वैद्याच्या बनावट चिकित्सालयात धाड पडताच त्याने आरडाओरडा करून गावातील लोकांना एकत्र केले आणि पथकाशी हुज्जत घातली. या प्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. (जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेली समिती नियमितपणे बनावट आधुनिक वैद्यांची पडताळणी करत नसल्याने राज्यात बनावट आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे हे बनावट आधुनिक वैद्य जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. याला उत्तरदायी असणार्‍या प्रशासनातील दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)

अरबिंदो बिस्वास हे बनावट चिकित्सालय चालवत असल्याची माहिती आरोग्य पथकाला मिळाली. त्यावरून पैठण तालुका आरोग्य अधिकारी भूषण आगाज, वैद्यकीय अधिकारी युसुफ मनियार, वैद्यकीय अधिकारी सुभाष थोरात यांनी बनावट आधुनिक वैद्य  बिस्वास याच्या चिकित्सालयाची झडती घेतली. या वेळी त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शिक्षण पात्रता आढळली नाही, तसेच अ‍ॅलोपॅथी औषधे, इंजेक्शनेचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे येथे आढळली.

चौकशी करत असतांना बिस्वास यांनी आरडाओरड करून गावातील लोक जमा केले. या वेळी आरोपी भगवान गोर्डे, शिवाजी गोर्डे यांनी बिस्वास यांच्यावर कारवाई करू नका, असे म्हणत पथकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, तसेच इंजेक्शनचा साठा आणि शस्त्रक्रिया करण्याची उपकरणे घेऊन ते निघून गेले. यासमवेत त्यांनी आरोपी बिस्वास याला पसार होण्यास साहाय्य केले.