सोलापूर महापालिकेच्या १५ आरोग्य केंद्रांमध्ये चालू करणार ‘औषध बँक’ !

रुग्णांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेने स्तुत्य निर्णय घेतला असून अन्य महापालिकांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यावा !

सोलापूर महापालिका

सोलापूर – सर्वसामान्य व्यक्तींना पैशांअभावी चांगली औषधे मिळत नाहीत, त्यासाठी महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रांमध्ये ‘औषध बँक’ चालू करण्याचा निर्णय आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतला आहे. कोरोना काळात जास्तीत जास्त लोकांवर विनामूल्य उपचार व्हावेत यासाठी आयुक्तांनी अल्पावधीत ‘बॉईज हॉस्पिटल’, राज्य कामगार विमा हॉस्पिटल, काडादी मंगल कार्यालय येथे ऑक्सिजन खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आता लोकांना चांगली औषधे मिळावीत यासाठी ते औषध बँक चालू करणार आहेत.

नव्या उपक्रमाविषयी आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले की, अनेक लोक महागड्या औषध-गोळ्या खरेदी करतात. रुग्ण बरे झाल्यानंतर ही औषधे पडून रहातात किंवा कचर्‍यात टाकून दिली जातात. ही औषधे लोकांना महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जमा करायची आहेत. आरोग्य केंद्रामध्ये एक पेटी ठेवण्यात येईल. मुदत संपलेली किंवा कालबाह्य झालेली औषधे येथे देऊ नये. शक्य ते साहाय्य करा. सामाजिक संस्थांनी या उपक्रमासाठी पुढे यावे.