१. पू. माईणकरआजी यांच्या संदर्भात लक्षात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सूत्रांमागील कार्यकारणभाव
१ अ. पू. माईणकरआजी यांचा पार्थिव देह पिवळसर दिसणे : पू. माईणकरआजी यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत होते. चैतन्य पिवळसर रंगाचे असल्यामुळे देहत्यागानंतरही त्यांचा पार्थिव देह स्थुलातून पिवळसर रंगाचा दिसत होता.
१ आ. पू. माईणकरआजी यांच्या पार्थिव देहातून पांढर्या रंगाचे तेजस्वी किरण प्रक्षेपित होणे : पू. माईणकरआजी यांच्याकडून वातावरणात निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहातून वातावरणात पांढर्या रंगाचे तेजस्वी किरण प्रक्षेपित होतांना दिसत होते. प्रक्षेपित होणारे हे चैतन्य सहन न झाल्यामुळे वाईट शक्ती आश्रमापासून दूर पळून गेल्या.
१ इ. पू. माईणकरआजी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांना आनंद जाणवणे : पू. माईणकरआजी यांची प्रभु श्रीरामावर पुष्कळ श्रद्धा होती. त्या रामनामाचा जप अखंड करत होत्या. त्यांचे अंतःकरण प्रभु श्रीरामाच्या भक्तीमध्ये डुंबलेले होते. त्या शिवदशेत असल्याने त्यांच्याकडून आनंदाच्या लहरी वायूमंडलात प्रक्षेपित होऊन त्यांच्या सभोवतालचे वातावरण आनंददायी झाले होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांना आनंद जाणवत होता.
१ ई. पू. माईणकरआजी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन निर्विचार होणे : पू. माईणकरआजी यांची साधना स्थळाशी संबंधित, म्हणजे विशिष्ट स्थानाशी निगडित राहिली नव्हती, तर ती काळाच्या स्तरावर चालू होती. त्या देहभान हरपून अखंड साधनारत होत्या. त्यांची साधना २४ घंटे, प्रत्येक क्षणी चालू होती. त्यांचा नामजप श्वासाबरोबर चालू होता. त्यांचा ‘अजपाजप’, म्हणजे अखंड नामजप चालू होता. त्यांच्या आत्म्याची ओढ निर्गुण स्वरूपातील ईश्वराकडे होती. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन निर्विचार होत होते.
१ उ. पू. माईणकरआजी यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन शांत आणि समाधानी होणे : पू. माईणकरआजी यांना कसलीच आसक्ती नव्हती. त्या मायेत असूनही नसल्याप्रमाणे होत्या. त्यांचे अंतःकरण प्रभूच्या भक्तीमध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहाचे दर्शन घेतांना साधकांचे मन शांत आणि समाधानी होत होते.
२. पू. माईणकरआजी यांना घेण्यासाठी साक्षात् श्रीराम येणे
पू. माईणकरआजी यांनी आजन्म प्रभु श्रीरामाची निस्सीम भक्ती केली होती. त्यामुळे त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी प्रभु श्रीरामाचे दर्शन होत होते. त्यांच्या मनामध्ये प्रभु श्रीरामाप्रती शबरीप्रमाणे भक्तीभाव होता. त्या प्रभु श्रीरामाच्या निस्सीम आणि विशेष भक्त होत्या. त्यामुळे जेव्हा पू. माईणकरआजी यांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांना नेण्यासाठी प्रभु श्रीराम रथातून आले होते. त्यांनी पू. माईणकरआजी यांच्या लिंगदेहाला रथामध्ये बसवून स्वतः रथ हाकला. हा रथ पू. आजींच्या भक्तीचे प्रतीक होता. हा भक्तीरथ हाकतांना प्रभु श्रीरामाला पुष्कळ आनंद झाला होता. त्यामुळे पू. आजींच्या देहत्यागानंतर वातावरण उदासीन न वाटता प्रफुल्लित, चैतन्यमय आणि आनंददायी झाले होते. त्यामुळे आश्रमामध्ये चैतन्य आणि आनंद यांची उधळण होऊन ‘पू. आजींचा अंत्यविधी चालू नसून मोठा उत्सवच चालू आहे’, असे जाणवत होते.
३. ‘भगवंत आपल्या प्रिय भक्तासाठी किती करतो !’, हे पू. माईणकरआजी यांच्या संदर्भात अनुभवण्यास मिळणे
पू. माईणकरआजी यांचे स्वागत करण्यासाठी स्वर्गलोकातील देवतांनी पृथ्वीवरील सनातनच्या रामनाथी आश्रमापासून रामलोकापर्यंत रेशमी पायघड्या घालून त्याच्या दोन्ही बाजूला पणत्या लावल्या होत्या. प्रभु श्रीराम पू. आजींचा लिंगदेह घेऊन भक्तीरथातून रामलोकाकडे पायघड्यांवरून जात होता. तेव्हा स्वर्गलोकातील देवतांनी मंगल वाद्ये वाजवून रथावर पुष्पवृष्टी केली. यावरून ‘भगवंत आपल्या प्रिय भक्तासाठी किती करतो !’, हे अनुभवण्यास मिळाले.
४. रामलोकात सीतामाता आणि हनुमान यांनी पू. माईणकरआजी यांचे स्वागत करणे
‘रामलोक’ हा वैकुंठाचा उपभाग असून तो जन आणि तप या लोकांच्या मध्ये स्थित आहे. प्रभु श्रीरामाने पू. माईणकरआजी यांना रथातून रामलोकात आणले. तेव्हा सीतामातेने पू. आजींच्या लिंगदेहाची आरती ओवाळून त्यांचे स्वागत केले. मारुतिरायाने त्यांच्या चरणांवर फुले वाहिली आणि त्यांचे भावपूर्ण दर्शन घेतले.
५. पू. माईणकरआजी यांना पुनर्जन्म नसणे आणि त्या रामलोकात राहूनच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणार असणे
पू. माईणकरआजी यांच्यामध्ये सगुण-निर्गुण स्तरावरील भक्ती असल्यामुळे त्या त्यांच्या सूक्ष्म रूपात काही काळ रामलोकात प्रभु श्रीराम, सीतामाता आणि हनुमान यांच्यासह रहाणार आहेत. त्यानंतर त्यांची आत्मज्योत प्रभु श्रीरामाच्या चरणी विलीन होणार आहे. त्यांना पुनर्जन्म नसल्यामुळे त्या सूक्ष्म रूपानेच रामराज्याची, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी रामलोकात राहूनच कार्य करणार आहेत.
६. प्रभु श्रीरामाने पू. माईणकरआजी यांच्या माध्यमातून सर्व साधकांना त्याची निष्काम भक्ती करण्याची शिकवण दिलेली असणे
पू. माईणकरआजी यांच्या माध्यमातून प्रभु श्रीरामाने समस्त साधकांना सतत भावावस्थेत राहून भगवंताचे निरपेक्षपणे अखंड नामस्मरण करण्याची अनमोल शिकवण दिली आहे. भगवंताचा परमभक्त निरिच्छ आणि निरपेक्ष राहून साधना करत असतो. यालाच ‘निष्काम साधना’ म्हणतात. भक्ताने केलेल्या निष्काम साधनेने भगवंत सर्वाधिक प्रसन्न होतो आणि भक्ताला देवाकडे काहीही न मागता सर्वकाही मिळते. पू. माईणकरआजी यांच्या माध्यमातून भगवंताने सर्व साधकांना त्याची निष्काम भक्ती करण्याची शिकवण दिली आहे.
कृतज्ञता
‘पू. माईणकरआजी यांच्या माध्यमातून मला निष्काम भक्ती करण्याची प्रेरणा मिळाली’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)
|