राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट, मृत्यूदर मात्र तसाच !

( प्रतिकात्मक छायाचित्र )

मुंबई, १९ मे (वार्ता.) – राज्यातील मागील आठवडाभराची आकडेवारी पहाता कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात घट होत असली, तरी कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या नागरिकांची संख्या ही अद्यापही शेकडोंच्या घरात आहे. ११ ते १७ मे या कालावधीत राज्यात कोरोनामुळे मृत्यू पावणार्‍यांची नियमित सरासरी संख्या ८०० इतकी आहे.

११ मे या दिवशी राज्यात कोरोनाचे ४० सहस्र ९५६ नवीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर १२ आणि १३ मे या दिवशी नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण ४० सहस्रच्या वर होते; मात्र १४ मेनंतर राज्यातील नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण न्यून होत आहे. १७ मे या दिवशी राज्यात २६ सहस्र ६१६ इतके कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मागील आठवडाभराची कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची आकडेवारी पहाता हा आकडा सकारात्मक आहे.