प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण

प्रा. वेलिंगकर यांनी फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल विधान केल्याचे प्रकरण

पणजी, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डि.एन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. डिचोली पोलीस या प्रकरणी प्रा. वेलिंगकर यांचे अन्वेषण करत आहेत. डिचोली पोलिसांनी ११ ऑक्टोबर म्हणजेच सलग दुसर्‍या दिवशी बंद दरवाजाआड प्रा. वेलिंगकर यांचे ३ घंटे अन्वेषण केले. या वेळी कोणते प्रश्न विचारले याविषयी माहिती मिळाली नाही; मात्र प्रा. वेलिंगकर यांनी अन्वेषणाला पूर्ण सहकार्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रा. वेलिंगकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात प्रविष्ट (दाखल) केलेल्या अटकपूर्व जामिनावर १५ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.

पोलिसांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले ! – प्रा. वेलिंगकर

प्रा. सुभाष वेलिंगकर

अन्वेषणानंतर पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर प्रा. वेलिंगकर पत्रकारांना म्हणाले, ‘‘अन्वेषणाच्या वेळी मी अधिकार्‍यांना आवश्यक ते सहकार्य केले आहे आणि मला पुन्हा बोलावल्यास मी अन्वेषणासाठी येईन.’’ ख्रिस्त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयीच्या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देतांना प्रा. वेलिंगकर म्हणाले, ‘‘हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्याने यावर न्यायालय निर्णय घेणार आहे.’’