१. निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः या नामजपाचे महत्त्व
मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी कितीही प्रयत्न केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होेतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.
१ अ. पुढील प्रयोग करा !
१. कोणत्याही वस्तूकडे पाहून निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप करतांना काय जाणवते, हे पहा. आपल्याला हे लक्षात येते की, आनंददायी वस्तूकडे पाहून आनंद होत नाही, तसेच दुःखदायक वस्तूकडे पाहून दुःखही होत नाही.
२. साधकांनी निर्विचार हा नामजप किंवा तो नामजप करणे कठीण जात असल्यास श्री निर्विचाराय नमः हा नामजप काही मास (महिने) प्रतिदिन अधिकाधिक वेळ करावा आणि काय जाणवते ?, ते [email protected] या ई-मेल पत्त्यावर टंकलेखन करून पाठवावे किंवा लिखित स्वरूपात सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१ या पत्त्यावर पाठवावे. कालांतराने हा नामजप करणे जमू लागल्यास, हाच नामजप पुढे सतत चालू ठेवावा. निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटचा नामजप आहे !
२. वाईट शक्तींचा त्रास असलेले
वाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना आध्यात्मिक उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत. याचे कारण म्हणजे त्या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.
३. भक्तीयोगी आणि ज्ञानयोगी
देवांच्या नामजपात भक्ती असू शकते, तर ज्ञानयोगात मनाची निर्विचार स्थिती असल्यामुळे निर्विचार स्थितीचा लाभ होतो; कारण अध्यात्मात शेवटी निर्गुण, निर्विचार स्थितीला जायचे असते. भक्तीयोगींनाही शेवटी सगुण भक्तीतून निर्गुण भक्तीत जायचे असते. त्यामुळे भक्तीयोगी असो, ज्ञानयोगी असो किंवा अन्य कोणत्या योगमार्गाने साधना करणारा असो, सर्वांनाच निर्विचार या नामजपाचा लाभ होणार आहे.
४. निर्विचार हा नामजप करतांना भाव ठेवणे आवश्यक नसणे
नामजप भावपूर्ण केल्याने भावातून मिळणार्या ईश्वराच्या आशीर्वादामुळे प्रगती लवकर होते. बुद्धीने भावपूर्ण नामजप करणे ज्ञानयोग्यांना कठीण जाते; म्हणून त्यांच्यासाठी निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप करणे सुलभ जाते. थोडक्यात निर्विचार हा नामजप करणे सर्वांनाच सहज शक्य आहे.
५. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेतील नामजपाला निर्विचार या नामजपाची जोड देणे
आतापर्यंत साधक स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेद्वारे मनातील अयोग्य विचारांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत होते; परंतु त्यासाठी अनेक वर्षे लागतात. दोष अधिक असल्यास ते दूर करायला अनेक जन्मही लागू शकतात. या पद्धतीने एका एका दोषावर प्रयत्न करण्यासह त्याला निर्विचार या नामजपाची जोड दिल्यास एकाच वेळी अनेक स्वभावदोष न्यून होतील. त्यामुळे प्रगती लवकर होईल. आता साधनेसाठी कलियुगातील पुढचा काळ फार अल्प आहे. त्यामुळे साधकांची जलद आध्यात्मिक प्रगती होण्यास निर्विचार हा नामजप साहाय्यभूत ठरेल. यावरून एक साधै सब सधै, सब साधै सब जाय । या हिंदी वचनाची आठवण होते.
६. मुद्रा
या नामजपाबरोबर वेगळी मुद्रा करण्याची आवश्यकता नाही; परंतु एखाद्याला मुद्रा करणे आवश्यक असल्यास सोयीस्कर वाटेल ती मुद्रा करावी.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या निर्विचार या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनंत अनंत कृतज्ञता !कुलदेवतेची उपासना केल्यास ती पुढे उपासकाला शिष्यपदापर्यंत नेते; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना गुरुकृपायोगानुसार साधनेच्या आरंभी कुलदेवतेचा नामजप करण्यास सांगितले. साधनेचा तो टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काळानुसार विविध जप दिले, उदा. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निर्मूलनासाठी सप्तदेवतांचे जप, पंचमहाभूतांचे जप, धर्मसंस्थापनेच्या कार्याला पोषक असलेला भगवान श्रीकृष्णाचा जप इत्यादी आणि ते करण्यास सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार आवश्यक त्या तत्त्वाची उपासना साधकांकडून करवून घेतली. गेल्या वर्षभरात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी त्यांनी साधकांना श्री विष्णवे नमः ।, श्री सिद्धिविनायकाय नमः । आणि श्री भवानीदेव्यै नमः ।, हे नामजप करण्यास सांगितले. यासमवेतच परात्पर गुरु डॉक्टरांनी शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ या निर्गुण स्तरावरील अभिनव जपांद्वारे साधकांना साधनेच्या पुढच्या पुढच्या टप्प्याच्या अनुभूती दिल्या. आता परात्पर गुरु डॉक्टर गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटचा निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः । हा जप सांगून साधकांचे मनोलय, बुद्धीलय, चित्तलय आणि शेवटी अहंलय या साधनेच्या अंतिम ध्येयाकडे वेगाने मार्गक्रमण करून घेत आहेत. साधनेला कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या जपापासून आरंभ करून परात्पर गुरुदेव साधकांना आता निर्गुण स्तरावरील निर्विचार स्थितीला घेऊन जात आहेत. अशा प्रकारे साधकाच्या साधनेच्या स्थितीनुसार, त्रासानुसार आणि काळानुसार नामजप करण्यास सांगून साधकांना अध्यात्मातील पुढच्या पुढच्या स्थितीला घेऊन जाणारे त्रिकालज्ञानी परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवाद्वितीय आहेत ! काळाची प्रतिकूलता जितक्या झपाट्याने वाढत आहे, त्याच्या अनंत पटीने गुरुदेव साधकांवर कृपेचा वर्षाव करत आहेत. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी कलियुगी भूतलावर अवतरलेले श्रीविष्णूचे अवतार सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी सर्व सद्गुरु, संत आणि साधक यांच्या वतीने अनंत अनंत कृतज्ञता ! – (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ (१३.५.२०२१) |
निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप करतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत१. आतापर्यंत साधकांना सकाळी किंवा रात्री ९.३० ते १० या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्यास सांगितले होते. यापुढे साधकांनी आता या वेळेत बसून ध्यान किंवा नामजप करण्याची आवश्यकता नाही. २. कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी सांगितलेला नामजप (श्री दुर्गादेव्यै नमः । (३ वेळा) – श्री गुरुदेव दत्त । – श्री दुर्गादेव्यै नमः । (३ वेळा) – ॐ नमः शिवाय ।) प्रतिदिन १०८ वेळा एका जागी बसून करावा. तसेच कोरोनाची लक्षणे असल्यास उत्तरदायी साधकांना विचारून आवश्यकतेनुसार हा जप अधिक संख्येत करावा. ३. एखादा साधक कुलदेवतेचा नामजप करत असल्यास तो साधक त्याच्या इच्छेनुसार तोच जप चालू ठेवू शकतो; मात्र त्याला पुढच्या टप्प्याचा निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप करावासा वाटल्यास, तो हा नामजप करू शकतो. ४. समष्टीसाठी नामजप करणारे संत आणि साधक : काही संत समष्टीसाठी काही घंटे नामजप करतात, तसेच ६० टक्क्यांहून अधिक पातळी असलेले काही साधक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मप्रसाराचे उपक्रम राबवतांना त्यांतील वाईट शक्तींचे अडथळे दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनीही आवश्यक ती प्रार्थना करून निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हाच नामजप करावा. – (श्रीसत्शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१३.५.२०२१) |
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंतीनामजपाच्या संदर्भातील प्रयोग करून पहा ! आध्यात्मिक स्तरावर विविध शब्दांचा जप केल्याने काय जाणवते, याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने निर्विचार या शब्दाप्रमाणे आंबा, पैसे अशा शब्दांचाही नामजप करून पहावा. असे नामजप केल्यानंतर काय जाणवते, ते [email protected] या ई-मेल पत्त्यावर टंकलेखन करून पाठवावे किंवा लिखित स्वरूपात सौ. भाग्यश्री सावंत, सनातन आश्रम, २४/बी रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा. पिनकोड ४०३४०१ या पत्त्यावर पाठवावे. |