गोव्यात प्रवेश करण्यास अडवल्याने सिंधुदुर्गातून गोव्यात कामाला जाणार्‍यांनी पत्रादेवी येथे वाहतूक रोखली

गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी कोरोना नकारात्मक अहवाल सक्तीचा केल्याचे प्रकरण

सावंतवाडी – गोवा राज्यात प्रवेशासाठी कोरोनाचा ७२ घंट्यांतील नकारात्मक (निगेटिव्ह) अहवाल सक्तीचा केल्यानंतर १३ मे या दिवशी गोव्यात नोकरीसाठी जाणार्‍यांना मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या युवक-युवतींनी महाराष्ट्राच्या सीमेतून गोव्यात जाणारी आणि गोव्यातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक रोखून धरली. ‘जर बंद करायची असेल, तर सर्वच वाहतूक बंद करा. कडक दळणवळण बंदी असतांना डंपरद्वारे खनिज वाहतूक कशी चालू आहे ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४८ घंट्यांनी कोरोनाचा अहवाल मिळतो, मग आम्ही प्रतिदिन तपासणी करत रहायची का ?’, असा प्रश्‍न या वेळी संतप्त आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या आंदोलनामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी तपासणी नाक्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.

गोवा राज्याच्या निर्णयाचा शिवसेनेकडून निषेध

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी जाणार्‍या नोकरदारांना १३ मे या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी तपासणी नाक्यावर कोरोनाविषयक अहवाल नसल्याने अडवण्यात आले. गोवा शासनाच्या या निर्णयाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे शिवसेना बांदा शहरप्रमुख साईप्रसाद काणेकर यांनी सांगितले. ‘शिवसेना गोव्यात जाणार्‍या नोकरदारवर्गाच्या पूर्ण पाठीशी रहाणार असून नोकरदार तरुण बेरोजगार झाल्यास याचे सर्व दायित्व गोवा शासनाचे रहाणार आहे’, असे काणेकर यांनी सांगितले.

समस्या सोडवण्याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सकारात्मक भूमिका

डॉ. प्रमोद सावंत

सावंतवाडी – उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार परराज्यातून गोवा राज्यात येणार्‍यांसाठी कोरोना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. नोकरीनिमित्त प्रतिदिन गोव्यात ये-जा करणार्‍यांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही फोनवरून चर्चा केली आहे. या विषयावर न्यायालयात सुनावणी होईल, तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोकरदारांचे सूत्र प्रकर्षाने मांडून यावर निश्‍चितपणे तोडगा काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्याचे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले.