श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अविरत अन्नदान सेवा

२२ दिवसांत १६ सहस्र ५०० लोकांना अन्नदान

अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – अक्कलकोट तालुक्यात अनेक गरजूंना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून जेवण देण्यात येत आहे. अशा तीव्र संकट काळात न घाबरता आणि न डगमगता शहरातील सर्वच भागांत जेवण पोचवण्याचे काम ‘जय हिंद फूड बँक’ करत आहे. या फूड बँकेचे अनुमाने पंधराहून अधिक युवक ‘स्वतःला कोरोना होईल किंवा आपल्यामुळे आपल्या कुटुंबियांना कोरोनाचा धोका उद्भवू शकतो’, याचा विचार न करता प्रतिदिन दुपारी १२ ते ४ या वेळेत जेवण वाटण्याचे काम करत आहेत. अशा पद्धतीने आजपर्यंत २२ दिवसांत १६ सहस्र ५०० लोकांना अन्न देण्यात आले आहे.

१. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले, सचिव श्यामराव मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण अक्कलकोट शहरात गोरगरीब, गरजूंना अन्नदान करण्यात येत आहे.

२. जय हिंद फूड बँकेचे सदस्य प्रतिदिन अन्नछत्रच्या वाहनातून आवश्यक असलेल्या भागांत अन्न घेऊन जातात. मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर राखणे या नियमांचे पालन करून अन्नदान सेवा करतात. या उपक्रमामुळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि जय हिंद फूड बँक यांच्या सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३. या उपक्रमासाठी अंकुश चौगुले, सतीश तमशेट्टी, शुभम बल्ला, योगेश पवार, महेश लिंबोळे, सुधीर तमशेट्टी, विनय गांगजी, बसवराज झुंजार, पंडित हत्तर्णी, आकाश चौगुले, शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार यांसह अन्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.