श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ

१. नाम किती घ्यावे ?

​‘संत तुकाराम महाराज यांनी ‘नाम किती घ्यावे ?’, याविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘शिंक येणे, जांभई येणे आणि खोकला येणे, ज्यामुळे भगवंताचे नाम घेण्यात व्यत्यय येईल, इतकाही आमचा वेळ वाया न जावा.’’

२. अनंत आणि सर्वज्ञानी ईश्वराशी एकरूप होण्यासाठी प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढायला हवा !

ज्ञान अमर्याद आहे. ‘अनंताचे ज्ञान आहे’, असे म्हटले जाते. मग या ज्ञानाला सर्वतोपरी जाणणारा ईश्वरही अनंत नाही का ? या अनंताशी आपल्याला एकरूप व्हायचे असेल, तर आपल्याला किती साधना केली पाहिजे !; म्हणूनच आपल्या साधने संदर्भात आपण कधीच समाधानी असू नये. ‘प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर साधना करण्याचा ध्यास वाढतच जावा’, हीच त्या अनंताच्या चरणी प्रार्थना !

३. सिद्ध, अवलिया, योगी आणि संत यांनी सूक्ष्मातील जाणणे

​सिद्ध, अवलिया, योगी आणि संत हे सतत निर्विचार स्थितीत असतात. त्यांना स्वतःचे असे काही विचार नसतात. ‘त्यांचे सर्वच ईश्वरेच्छेने चालू आहे’, याचे ज्ञान त्यांना झालेले असते. हे सिद्ध मायेच्या भौतिक जगात नसून दैवी जगात वावरत असतात. ते सतत ईश्वरी अनुसंधानात असतात. त्यांच्या मनाची निर्विचार स्थिती असल्याने त्यांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिक असते. ते बाह्यतः अतिसामान्य दिसत असले, तरी आतून ते असामान्य असतात. सिद्धांना ओळखणे कठीण असते.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (२३.४.२०२०)