मुंबई-गोवा महामार्गावरील मळगाव बॉक्सवेलजवळ बसवलेले बहिर्वक्र आरसे अज्ञाताने फोडले

सावंतवाडी – सावंतवाडी ते रेडी मार्गावरील मळगाव येथील बॉक्सवेलजवळ (मुख्य मार्गाच्या खालून जाण्यासाठी केलेला मार्ग) वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ‘बहिर्वक्र आरसे’ लावण्यात आले आहेत. यातील २ आरशांची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली. या घटनेच्या विरोधात मळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. (अशा प्रकारच्या घटनांमधून समाजाची नैतिकता किती खालावली आहे, हे लक्षात येते. आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला राष्ट्रप्रेम न शिकवल्यामुळे अशी समाजद्रोही वृत्ती आज डोके वर काढत आहे. त्यामुळे केवळ विकास करून चालणार नाही, तर तो विकास आपल्यासाठीच आहे, याची जाणीव जनतेत निर्माण होण्यासाठी समाजात नीतीमूल्यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक )

मळगाव येथील बॉक्सवेलजवळील मुख्य रस्त्यावरून येणारी वाहने आणि बॉक्सेवलमधून येणारी वाहने चालकांना दिसत नसल्याने येथे अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे या ठिकाणी ‘बहिर्वक्र आरसे’ बसवण्याची मागणी स्थानिकांमधून होत होती. या पार्श्‍वभूमीवर मळगावचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी पुढाकार घेत ‘रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी’च्या साहाय्याने येथे हे आरसे बसवले होते.