सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट किट’ संपली

  • जिल्ह्यात बाहेरून येणार्‍यांची तपासणी करण्यात अडचण

  • सरसकट सर्वांची तपासणी करण्यात येत असल्याने किटचा तुटवडा

सिंधुदुर्ग – कोरोनाची लक्षणे आढळणार्‍या रुग्णांची तपासणी करण्यासाठी ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट किट’ची आवश्यकता असते; परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट किट’ संपल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कणकवली शहरातील पटवर्धन चौकासह खारेपाटण पोलीस तपासणीनाक्यावरही या किटचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असणार्‍या रुग्णांची ‘रॅपिड टेस्ट’ करण्यास आरोग्य विभागाला मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सिंधुदुर्गात अपुर्‍या आरोग्य सुविधा असल्यामुळे आरोग्य विभाग कोरोनाशी झगडत आहे आणि आता किटचीही कमतरता भासत असल्यामुळे आरोग्य विभागावर ताण निर्माण झाला आहे. याविषयी आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडे ‘रॅपिड टेस्ट किट’ची मागणी करण्यात आली असून अद्याप किटचा पुरवठा झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. याविषयी आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्वांचीच ‘रॅपिड टेस्ट’ करण्याचा आग्रह करण्यात आला आहे; मात्र आता आवश्यकता असतांनाही रॅपिड टेस्ट किटचा तुटवडा भासत आहे.

खारेपाटण पोलीस तपासणीनाक्यावरून जिल्ह्यात येणार्‍या लोकांपैकी लक्षणे असणार्‍या लोकांची ‘रॅपिड टेस्ट’ करणे आवश्यक आहे. त्यातच अनेक ठिकाणी शहरांमध्ये ‘रॅपिड टेस्ट’साठी पथके तैनात करण्यात आली असून, तेथेही रॅपिड किटचा भासणारा तुटवडा तातडीने दूर करण्याची मागणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ‘आय.सी.एम्.आर्.’च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लक्षणे असणार्‍या रुग्णांची ‘रॅपिड टेस्ट’ करणे आवश्यक आहे, तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणार्‍या किंवा अन्य गंभीर रुग्णांची तपासणी करण्यासाठी ‘रॅपिड टेस्ट किट’ शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ५६९ नवीन रुग्ण : ८ जणांचा मृत्यू

१. गेल्या २४ घंट्यांतील नवीन रुग्ण ५६९

२. उपचार चालू असलेले रुग्ण ३ सहस्र ३९६

३. बरे झालेले एकूण रुग्ण १० सहस्र ५२३

४. मृत्यू झालेले एकूण रुग्ण ३६६

५. आतापर्यंतचे एकूण रुग्ण १४ सहस्र २९१