दिवसभरात २ सहस्र ८१४ कोरोनाबाधित, तर ५२ रुग्णांचे निधन

पणजी, ४ मे (वार्ता.) – राज्यात ४ मे या दिवशी कोरोनाबाधित २ सहस्र ८१४ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ मे या दिवशी कोरोनाशी संबंधित एकूण ६ सहस्र ५५२ चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४२.९४ टक्के आहे. राज्यात मार्च २०२० मध्ये कोरोना महामारी आल्यापासून एकूण १ लक्ष ९०२ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. ४ मे या दिवशी १ सहस्र ८७० रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत, त्यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ सहस्र ७३१ झाली आहे.

राज्यात सर्वाधिक मडगाव येथे २ सहस्र २६२ अन् यापाठोपाठ पणजी १ सहस्र ६९५, कांदोळी १ सहस्र ५८०, म्हापसा १ सहस्र ५७५, फोंडा १ सहस्र ५७४, कुठ्ठाळी १ सहस्र ३३७, पर्वरी १ सहस्र २९३, डिचोली १ सहस्र ४७, सांखळी ८९४, पेडणे ८७५, शिवोली ८३५, वास्को ७४९ आणि कुडचडे ७०८, अशी आरोग्य केंद्रागणिक रुग्णसंख्या आहे.

मृत्यूचा दर अल्प करण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात ‘स्टेप अप हॉस्पिटल’ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर अल्प करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ‘स्टेप अप हॉस्पिटल’ स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांच्या ‘व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंग’द्वारे घेतलेल्या एका बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोमंतकियांना आवाहन आहे की, त्यांनी या ‘स्टेप अप हॉस्पिटल’मध्ये उपचार घ्यावेत.’’