नागपूर येथे कोरोनाच्या ३५ नमुन्यांत ५ नवीन ‘स्ट्रेन’ आढळले !

  • संसर्गाची क्षमता अधिक  

  • सर्दी, खोकला, ताप आणि अतिसार ही प्रमुख लक्षणे

नागपूर – शहरात कोरोनाचे ५ नवीन ‘स्ट्रेन’ सापडले आहेत. देहली येथून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३५ नमुन्यांमध्ये हे नवीन ‘स्ट्रेन’ आढळून आले आहेत. सर्दी, खोकला, ताप आणि अतिसार अशी या नव्या ‘स्ट्रेन’ची प्रमुख लक्षणे आहेत.

येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर शासकीय वैद्यकीय विद्यालय येथे आलेल्या संशयित रुग्णाचे हे नमुने एन्.आय.व्ही. आणि देहली येथील एन्.सी.डी.सी.ला पाठवण्यात आले होते. याचा अहवाल आला असून यामध्ये ७४ पैकी ३५ नमुन्यांमध्ये ५ विविध प्रकारचे ‘म्युटेशन’ असल्याचे समोर आले आहे. यातील २६ नमुन्यांमध्ये ‘डबल म्युटेशन’ असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी म्हटले आहे. नव्या ‘म्युटेशन’मध्ये कोरोनानंतरच्या प्रतिकारशक्तीचाही उपयोग होत नसल्याचे दिसून आले आहे.

‘डबल म्युटेशन’ अधिक घातक !

‘डबल म्युटेशन’, म्हणजे एकाच जीन्समध्ये २ पद्धतीने पालट झालेले असतात. हे मानवासाठी अधिक घातक ठरू शकतात. पूर्वी कोरोना होऊन गेलेल्या आणि कोरोनावर मात केलेल्या एखाद्या व्यक्तीमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते; मात्र नवीन ‘म्युटेशन’मध्ये या रोग प्रतिकारशक्तीचा लाभ होत नसल्याने पुन्हा कोरोना होण्याची शक्यता आहे.