… तर १ जूनपर्यंत मुंबईतील कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर आटोक्यात येऊ शकेल ! – टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च

मुंबई – मुंबईमध्ये ७५ टक्के लसीकरण झाले, तर १ जूनपर्यंत कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचा दर आटोक्यात येण्याची शक्यता आहे, असा अभ्यास टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांनी नोंदवला आहे.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार दुसर्‍या लाटेसाठी कारणीभूत ठरला आहे. लोकल रेल्वेगाडी चालू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात चालू झाला. फेब्रुवारीमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य मोठ्या जिल्ह्यांमध्ये हा नवीन विषाणू वेगाने पसरत गेला. रस्त्यांवर नागरिक आणि गाड्या यांची गर्दी वाढल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे अधिष्ठाता डॉ. संदीप जुनेजा म्हणाले, ‘‘मुंबईमध्ये मासाभरात २० लाख नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, तरच जून मासापर्यंत मृत्यूदर न्यून होण्याची शक्यता आहे. १ जुलै किंवा त्यानंतर लवकरच शाळाही चालू करता येऊ शकतात; मात्र हे पूर्वानुमान असल्याने यामध्ये चूक होण्याचीही शक्यता आहे. जुलै मासात या सर्वांचे मूल्यांकन करता येईल.’’