१ लाख ७० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त !
भंडारा – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्या ६ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून १ मे या दिवशी अटक केली. या कारवाईत ३ महिला परिचारिकेसह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ४ इंजेक्शन, ९० सहस्र रुपये रोख, दुचाकी, ३ भ्रमणभाष आणि औषध साठा असा १ लाख ७० सहस्र ९६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनिकेत ढवळे, बबन बुधे, सचिन हुमणे, खुशबू इलमकर, करिष्मा पारधी, आचल नागदेवते अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा अपलाभ घेऊन मूळ किमतीपेक्षा अधिक दराने त्याची विक्री करण्याचा धंदा ही टोळी करत होती. बबन बुधे याच्या माध्यमातून रेमडेसिविर खरेदीचा व्यवहार करण्यात आला. एका औषध दुकानासमोर ४ इंजेक्शन १ लाख २० सहस्र रुपयांत देण्याचे ठरले.
करिष्मा आणि खुशबू यांच्या घरांची झडती घेतली असता त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला रोख ९० सहस्र रुपये आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा सापडला. पाचही जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता वर्धा जिल्ह्यातील आचल नागदेवते हिचे नाव समोर आले. तिघीही नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी असून शहरातील विविध रुग्णालयांत कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.