जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्धतेमुळे कोरोनाबाधितांची संख्या घटली !

नंदुरबार जिल्ह्याचा आरोग्य स्वयंपूर्णत्वाचा आदर्श !

नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श इतर जिल्ह्यांनी घेऊन त्याप्रमाणे नियोजनबद्ध कृती आराखडा सिद्ध करून काम केल्यास निश्‍चितच सर्व जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होईल !

डॉ. राजेंद्र भारूड

नंदुरबार – जिल्ह्याने कोरोनाच्या संकटात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये विलक्षण पालट घडवले. इतर जिल्हे वाढती रुग्णसंख्या आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अडचणीत होते; पण नंदुरबारने एप्रिलच्या प्रारंभी दिवसाला १ सहस्र २०० पर्यंत गेलेली नव्या रुग्णांची संख्या विविध प्रयोगांमुळे आता प्रतिदिन २५० आणि ३०० पर्यंत खाली आणली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नियोजनबद्ध कामाचा हा परिणाम आहे. ऑक्सिजनच्या पूर्ततेविषयी नंदुरबार जिल्हा ५० टक्के स्वयंपूर्ण झाला आहे.

कोरोनाच्या प्रारंभीच्या काळात येथील शासकीय रुग्णालयात केवळ २० खाटा होत्या. प्रशासनाने आता खासगी आणि शासकीय अशा दोन्ही ठिकाणी मिळून १ सहस्र २०० इतक्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर खाटांची व्यवस्था केली आहे. मनुष्यबळ अपुरे असतांना स्थानिक एम्.बी.बी.एस्, बी.एच्.एम्.एस्. झालेले आणि परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना योग्य प्रशिक्षण देऊन आरोग्ययंत्रणेने या परिस्थितीतून मार्ग काढला.

प्रथम नंदुरबारला ऑक्सिजनसाठी धुळे गावावर विसंबून रहावे लागत होते. डॉ. भारूड यांनी जिल्हा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापन निधीतून जिल्ह्यात सप्टेंबर २०२० मध्ये हवेतून ऑक्सिजननिर्मितीचा पहिला प्रकल्प कार्यान्वित केला. १२५ मोठे सिलिंडर अशी या प्रकल्पाची क्षमता आहे. जिल्हाधिकारी भारूड हे स्वत: आधुनिक वैद्य असल्याने त्यांनी दुसर्‍या लाटेचा अंदाज बांधून फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसर्‍या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ केला. मार्चमध्ये  तो कार्यान्वितही झाला. एप्रिलमध्ये शहादा येथे अशाच पद्धतीने तिसरा प्रकल्प चालू केला. त्यामुळे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजननिर्मितीचे ३ शासकीय प्रकल्प कार्यरत झाले. येथील शासकीय रुग्णालयांना अनुमाने ४०० सिलिंडरची निकड या ३ प्रकल्पांतून भागवली जात आहे.

कोरोनाच्या काळात होत असलेले परिवर्तन हे माझ्या एकट्याचे श्रेय नाही. यामागे जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणेसह सर्वांनी दिवसरात्र मेहनत घेतली. खर्‍या अर्थाने भविष्याचा वेध घेत नंदुरबार जिल्ह्याने टाकलेले हे पाऊल राज्य आणि केंद्र शासनाच्या पाठबळाने शक्य झाले.

– डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार.