१८ वर्षे वयोगटापुढील सर्वांना लसीकरण करण्याचा निर्णय स्तुत्य असला, तरीही सद्य परिस्थिती पहाता लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाही लस घेण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागत आहेत. प्रशासनाने सर्वांना लस वेळेत मिळावी, यासाठी नियोजनात सूसुत्रता आणणे अपेक्षित आहे.
पुणे – १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी लस देण्याचा निर्णय घोषित केला असला, तरी लसीच्या तुटवड्यामुळे या निर्णयाची केवळ प्रातिनिधिक पद्धतीने कार्यवाही केली जाणार आहे. यासाठी कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत लसीकरण होणार आहे. ज्या लाभार्थींनी नोंदणी करतांना या २ रुग्णालयांची निवड केली असेल, अशा केवळ ३५० जणांनाच लस देण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी न केलेल्या नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.