आरोग्य विभागाला याविषयी काय म्हणायचे आहे ?
ठाणे, ३० एप्रिल (वार्ता.) – पालघर जिल्ह्याला पुरवठा केलेल्या रेमडेसिविरच्या ६५० कुप्यांचा वापर न करण्याचे आस्थापनाने जाहीर केले होते; पण आदेश मिळण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांनी २३२ रुग्णांवर रेमडेसिविर औषधाचा वापर केला. त्यामुळे १३ रुग्णांना त्रास झाला. शरिराला कंप सुटत असल्याचे रुग्णांनी सांगितले. रायगडमध्ये रेमडेसिविरच्या ५०० कुप्या देण्यात आल्या होत्या. त्यापैकी १२० कुप्या रुग्णांना देण्यात आल्या. ९० जणांना इंजेक्शन घेतल्यावर त्रास जाणवला, तर पुण्यात २ सहस्र १५५ कुप्या वितरित झाल्या होत्या. त्यातील काही कुप्या रुग्णांसाठी वापरण्यात आल्या. नंतर त्यांना त्याचा त्रास झाला.
रायगड जिल्ह्यात ‘हेटेरो हेल्थ केअर’ आस्थापनाने वितरित केलेल्या इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत. या इंजेक्शन्सचा पुरवठा पुणे शहरासह जिल्ह्यातही थांबवण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने संबंधित आस्थापनाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
पालघरमधील सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे पालघरचे उपजिल्हाधिकारी, तसेच रेमडेसिविर इंजेक्शनच्या वितरण व्यवस्थेचे समन्वयक सुरेंद्र नवले यांनी सांगितले. सध्या इंजेक्शनचा वापर रोखण्यात आला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य राजेंद्र केळकर यांनी सांगितले.