मुंबईतही पावसाची शक्यता !
मुंबई – सध्या गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिणेकडील अन्य भागांत अवकाळी पावसाचे ढग दाटले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पुढील पाच दिवसांत वादळी वारा आणि मेघगर्जना यांसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ‘आठवड्याच्या शेवटी मुंबईतही अवकाळी पाऊस पडू शकतो’, असे तज्ञांचे मत आहे.
मध्य महाराष्ट्रात विजांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. १-२ ठिकाणी गारपीटही होऊ शकते, असे अनुमान हवामान खात्याने वर्तवले आहे. मागील ३ दिवसांत सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला, तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.