युवासेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीमहसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तहसीलदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे ! |
अकलूज (जिल्हा सोलापूर), २९ एप्रिल (वार्ता.) – मुख्यमंत्री ग्रामसडक योजना वर्ष २०१९-२० अंतर्गत पंढरपूर-शेळवे-खळवे-माळखांबी या २८.८०० किलोमीटर रस्त्यासाठी श्री. एस्.एम्. आवताडे कन्स्ट्रक्शन आस्थापनाने प्रशासनाची कोणतीही अनुमती न घेता, तसेच महसूल न भरता अनुमाने ४४ सहस्र ६३० ब्रास मुरूम अवैधरित्या उत्खनन करून शासनाचा ४६ कोटी ४१ लाख ५५ सहस्र रुपये महसूल बुडवला आहे; मात्र तहसीलदार जगदीश निंबाळकर हे या आस्थापनाला पाठीशी घालत असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी युवासेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील वाघमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
स्वप्नील वाघमारे यांनी शेतकर्यांसमवेत आंदोलने करून स्थानिक महसूल प्रशासनाला पुरावे देऊन एस्.एम. आवताडे आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यास भाग पाडले होते; मात्र हा दंड वसूल करण्यासाठी स्वप्नील वाघमारे यांनी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही हा दंड वसूल करण्यात आलेला नाही. त्यामुळे महसूल विभागाने दिलेल्या आदेशाची कार्यवाही करून दंडाची रक्कम त्वरित वसूल करण्यात यावी, अशी मागणीही स्वप्नील वाघमारे यांनी या वेळी केली आहे.