१. भारताने चीनच्या शत्रूराष्ट्रांना आपले मित्र बनवणे
१ अ. चीन शत्रूंशी लढण्यात गुंतल्याचा भारताला लाभ होणे : चीनचे भारताच्या विरोधात ३६५ दिवस युद्ध चालू असते. मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटना एकत्र केल्यास भारताची चीनच्या विरोधातील आघाडी अधिक सबळ होत असल्याचे दिसत आहे. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे आर्य चाणक्य यांनी सहस्रो वर्षांपूर्वी सांगितले आहे. त्याप्रमाणे भारताने चीनच्या शत्रूराष्ट्रांशी पुष्कळ चांगली मैत्री केली आहे. भारत चीनला एकाच वेळी अनेक शत्रूंशी लढण्यास भाग पाडत आहे. त्यामुळे चीन त्यांच्याशी लढण्यात गुंतलेला आहे. त्याचा भारताला चांगला लाभ होत आहे.
१ आ. चीन करत असलेले मानसिक युद्ध : फिलिपिन्सच्या ‘एक्सक्लुझिव्ह झोन’मध्ये चीनच्या २५० मच्छिमार बोटी आलेल्या आहेत. तेथून त्या बाहेर जायला सिद्ध नाहीत. त्यामुळे फिलिपिन्सला आता व्हिएतनामसमवेत जपान आणि अमेरिका हे देशही साहाय्य करत आहेत. या चिनी बोटी पुढे येण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे चीनचा हा केवळ मानसिक युद्धाचा प्रकार आहे.
१ इ. चीन-तैवान संघर्ष आणि अमेरिकेचे तैवानला साहाय्य : चीन म्हणतो की, तैवान हा आमचा देश आहे; पण गेल्या काही दिवसांपासून चीन तैवानला पुष्कळ त्रास देत आहे. काही दिवसांपूर्वी चीनची २५ ते ३० लढाऊ विमाने त्यांच्या हवाई हद्दीत घुसली होती. असे प्रकार चीनने २ ते ३ वेळा केले. त्यानंतर लगेचच अमेरिकेने तैवानला साहाय्य केले. आता तैवानने त्यांची क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. जपानही तैवानला साहाय्य करत आहे.
१ ई. चीन आणि कोरिया संघर्ष : येत्या काही वर्षांमध्ये ‘चीनला जगातील महाशक्ती व्हायचे आहे’, असे त्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यासाठी त्याने भारताला लडाखमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला; पण तेथे त्याची डाळ शिजली नाही. आता तो दक्षिण चीन समुद्रामध्ये फिलिपिन्स आणि तैवान यांना त्रास देत आहे. एवढेच नाही, तर त्याने दक्षिण कोरियालाही त्रास देणे चालू केले आहे. यासाठी त्याने उत्तर कोरियामध्ये क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत; पण चीनच्या या प्रकारामुळे दक्षिण कोरिया थोडाही घाबरलेला नाही. संरक्षण क्षेत्रात दक्षिण कोरिया आणि भारत यांचे सहकार्य वाढणार आहे. भारत बोफोेर्सहून अधिक शक्तीशाली तोफ सिद्ध करत आहे. त्यासाठी दक्षिण कोरियाने साहाय्य केले आहे.
२. भारताने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशाची संरक्षण यंत्रणा सबळ करणे
वर्ष २०१४ पूर्वी भारत ७० टक्के शस्त्रे आयात करत होता. सध्या हे प्रमाण न्यून झाले असून वर्ष २०२० मध्ये ते ४० टक्क्यांवर आलेले आहे. येणार्या काळात आत्मनिर्भर भारताचे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले, तर हे प्रमाण १० टक्क्यांवर आणण्यात येणार आहे. यासमवेतच भारताच्या संरक्षण उद्योगामध्ये २५० ‘स्टार्टअप’ चालू होणार आहेत. सध्या भारत शस्त्रास्त्र निर्यातीमध्ये पहिल्या २५ देशांमध्ये पोचला आहे.
२ अ. ड्रोन्सचा वापर : आता जुने तंत्रज्ञान कालबाह्य होत असून ‘डिस्रप्टीव्ह टेक्नॉलॉजी’चा (विघटनकारी तंत्रज्ञानाचा) वापर करत आहे. ड्रोनही या तंत्रज्ञानाचा एक भाग आहे. काही मासांपूर्वी अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमध्ये लढाई झाली होती. या लढाईत अझरबैजानने ड्रोन्सच्या साहाय्याने आर्मेनियाचे रणगाडे आणि तोफा उद्ध्वस्त केल्या होत्या. ड्रोन हे लढाऊ विमानांच्या तुलनेत अतिशय स्वस्त असतात. ते पायलटविना हवेत उडत असल्यामुळे युद्धाच्या वेळी पायलट सुरक्षित रहातात. लढाईच्या वेळी ड्रोन्सचा थवा, म्हणजे ४०-५० ‘स्वॉर्न’ ड्रोन वापरली, तर ते लढाऊ विमानाशी चांगली टक्कर देऊ शकतात. सध्याच्या स्थितीत भारत ड्रोनचा वापर टेहाळणीसाठी करत आहे.
२ आ. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धीमत्ता) : या तंत्रज्ञानाचा वापर भारत अनेक ‘डिसिजन मेकिंग टूल्स’मध्ये करत आहे. हे तंत्रज्ञान आपण डेटाचे विश्लेेषण करण्यासाठी वापरत आहोत. या तंत्रज्ञानावर भारत काम करत आहे. भारताची स्पर्धा चीनशी आहे आणि चीन या तंत्रज्ञानामध्ये भारताच्या पुष्कळ पुढे आहे. त्यामुळे भारताला संशोधनाचा वेग वाढवावा लागणार आहे. यासाठी भारताने विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय शास्त्रज्ञांचे साहाय्य घेतले पाहिजे. विदेशात अनेक मोठ्या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ काम करत आहेत. अमेरिकेच्या ‘नासा’ या संस्थेत ३० टक्के भारतीय शास्त्रज्ञ आहेत. या शास्त्रज्ञांपैकी काहींना भारतात परत बोलावून आपण संशोधनाचा वेग वाढवू शकतो.
२ इ. रोबोटिक्स : भारत स्फोटक पदार्थ ‘न्यूट्रलाईज’ करण्यासाठी रोबोटिक्सचा वापर करू शकतो. नक्षलवादी भागात रोबोटिक्सचा वापर करून आपण आपल्या सैनिकांना अधिक सुरक्षित ठेवू शकतो. याखेरीज ‘इथरनेट थिक’, ‘कॉन्टम टेक्नॉलॉजी’, ‘५ जी’ या तंत्रज्ञानांमध्ये आपल्याला पुष्कळ प्रगती करायची आहे. यासाठी ‘डी.आर्.डी.ओ.’ ने अनेक प्रकारचे संशोधन चालू केले आहेत. अनेक भारतीय मुले ‘आयआयटी’मध्ये शिकत असतात. ती अतिशय बुद्धीमान असतात. त्यातील ९० टक्के मुले नंतर विदेशात जातात. ती भारतातच थांबतील, अशी आशा करूया.
२ ई. एअरक्राफ्ट : एअरक्राफ्ट ही एक ‘डिस्रप्टीव्ह टेक्नॉलॉजी’ आहे. सध्या भारतात २ एअरक्राफ्ट कॅरिअर आहेत, तर चीनमध्ये ३ आहेत. अशा प्रकारच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारत चीनची स्पर्धा करू शकत नाही. एअरक्राफ्टची किंमत प्रचंड असते. यापेक्षा आपण ‘हायपरसॉनिक’ क्षेपणास्त्रे बनवत आहोत. या क्षेपणास्त्रांमध्ये चीनची एअरक्राफ्ट उडवण्याची क्षमता आहे. एअरक्राफ्ट क्रूझ आणि अन्य क्षेपणास्त्रांचे संयोजन असते. त्याची गती ही आवाजाच्या ५ पट असते. ते रडारवर पटकन दिसत नाहीत. एका एअरक्राफ्टच्या किमतीमध्ये आपण ७ ते ८ पाणबुड्या बनवू शकतो. पाणबुड्या या न्यूक्लिअर आणि डिझेल या दोन प्रकारांमध्ये असतात. न्यूक्लिअर पाणबुड्या पॅसिफिक किंवा हिंदी महासागरामध्ये कायम गस्त घालू शकतात. त्यामुळे चीनवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवता येईल.
३. युरोपीय महासंघातील देश चीनच्या विरोधात गेल्याचा लाभ भारताला मिळणे
भारतीय नौदल फ्रेंच नौदलाशी युद्धाभ्यास करणार आहे. ही भारतासाठी चांगली बातमी आहे. यापूर्वी आपण ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका, तसेच आशियातील काही देशांसमवेत युद्धाभ्यास केलेला आहे. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपीय महासंघाशी वाद घातले. त्यामुळे युरोपीय महासंघातील देश अमेरिकेचे मित्र बनण्याऐवजी शत्रू होऊ लागले आणि ते चीनच्या अधिक जवळ गेले. बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर जर्मनीने चीनशी मुक्त व्यापाराचा करार केला. हे भारताच्या दृष्टीने फार वाईट झाले; परंतु आता इंग्लंड आणि फ्रान्स या देशांनी चीनवर बहिष्कार टाकणे चालू केले आहे. चीन उघूर मुसलमानांचा छळ करतो. त्यामुळे युरोपीय देशांनी चीनचा कापूस घेण्यास नकार दिला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनही अशा आस्थापनांवर बहिष्कार टाकत आहे. अशा प्रकारे युरोप आणि चीन यांच्यात काही प्रमाणात व्यापारी युद्ध चालू झाले आहे. युरोप चीनकडून कापूस घेणार नाही; म्हणजे तो भारताकडून घेईल. ही आपल्याला चांगली संधी आहे.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे