मुंबई – कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचावर देशाचा नेता किंवा शासन यांचा अपमान होणे ठीक नाही. परदेशात प्रसारमाध्यमे आणि सामाजिक माध्यमे यांवर भारताचे वाईट चित्र रंगवले जात आहे. त्यामुळे देशातील व्यवहार, सामाजिक आरोग्य यांवर वाईट प्रभाव पडतो. भारतीय अर्थव्यवस्थेला संपवण्याचे हे मोठे षड्यंत्रही असू शकते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी २७ एप्रिल या दिवशी केले आहे.
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारल्याप्रकरणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी खासदार संजय राऊत म्हणाले,
१. मद्रास उच्च न्यायालयाने टिप्पणी केली आहे, हेच आम्ही अनेक मास सांगत आहोत, तसेच ममता बॅनर्जी आणि विरोधक सांगत होते. निवडणूक आणि कोरोना यांचा काही संबंध नाही.
२. ज्या राज्यांमध्ये निवडणूक नाही, तेथेही कोरोना झाल्याचे भाजपच्या नेत्यांचे स्पष्टीकरण आहे. भाजपने बंगाल, केरळ आणि तमिळनाडू येथे प्रचारासाठी संपूर्ण देशातून लोक जमा केले. हे चुकीचे नाही, निवडणुकीत अशी रणनीती असते; पण सध्या देशात परिस्थिती ठीक नाही.
३. काही लोक कुंभमेळ्यामध्ये गर्दी होते आणि कोरोनाचा प्रसार होतो; म्हणून आक्षेप घेत असतील, तर पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांमध्ये निवडणुकीमुळे अजून गर्दी होते. माझा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. मोदी यांनी ज्या पद्धतीने संकटाशी लढण्यासाठी पकड घेतली आहे, कोरोनाच्या दुसर्या आणि तिसर्या लाटेसमवेत लढण्यासाठी त्यांनी धोरण आखले आहे, ते पहाता ‘मद्रास न्यायालयाने केलेली टिप्पणी ते गांभीर्याने घेतील’, असा मला विश्वास आहे.
४. भारताचा अपमान हा राजकारणाचा विषय नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमान होत असेल, तर सर्वांनी आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून देशाच्या पंतप्रधानांसमवेत उभे राहिले पाहिजे. जी नीती मोदी आखतील, त्याच्यासाठी आम्ही उभे राहू.’’