सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांसह कातळशिल्पांना जागतिक वारसा नामांकन मिळण्याच्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता

सिंधुदुर्ग – महाराष्ट्र शासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या वतीने युनेस्कोला (संयुक्त राष्ट्रे शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्थेला) सादर केलेल्या महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य आणि कोकणातील कातळशिल्पे यांना जागतिक वारसा नामांकन मिळण्याच्या प्रस्तावांचा तत्त्वत: स्वीकार करण्यात आला आहे. जागतिक वारसा नामांकन मिळणार्‍या स्थळांमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांसह राज्यातील अनेक किल्ले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कातळशिल्पे यांचा समावेश आहे, अशी माहिती घुंगुरकाठी संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात लळीत यांनी म्हटले आहे की, युनेस्कोच्या वतीने जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी प्रतिवर्षी १८ एप्रिल हा ‘जागतिक वारसा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘गुंतागुंतीचा भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ (Complex Past and Diverse Future) ही संकल्पना घेऊन हा दिवस साजरा होत आहे. राज्याचे पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र  शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य (ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोंगरी आणि समुद्री किल्ल्यांचा समावेश आहे.) आणि कोकणातील ‘कातळशिल्पे’ हे प्रस्ताव युनेस्कोला पाठवले होते. युनेस्कोने या प्रस्तावांचा तत्त्वत: स्वीकार केला आहे.

या नामांकन प्रक्रियेत रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील कातळशिल्पांसह रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी येथील कातळशिल्प स्थानांचा समावेश आहे. यामुळे या किल्ल्यांसह कातळशिल्पांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी साहाय्य मिळणार आहे.