आपत्काळातही पैसे कमावण्याचा धंदा करत रहाणारे आधुनिक वैद्य !
कल्याण, २० एप्रिल (वार्ता.) – ठाणे जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार चालू असल्याने जिल्हाधिकार्यांनी पुरवठा नियंत्रित करण्यासाठी जिल्हा नियंत्रण समिती स्थापन केली आहे, तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगू नये, असे निर्देश दिलेले आहेत. असे असतांनाही कल्याण-डोंबिवली येथील आधुनिक वैद्यांकडून हे इंजेक्शन बाहेरून आणण्याचा सल्ला खासगीत दिला जात आहे, अशी चर्चा आहे. रुग्णाला त्रास होऊ नये, यासाठी नातेवाईक हे इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यातूनच इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. या इंजेक्शनविषयी कल्याण-डोंबिवली येथे अतिरेक चालू असून त्याविषयी रुग्णांचे नातेवाईक उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत, असेही समजते.
समितीच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने एक अर्ज सिद्ध केला असून, तो आरोग्य विभागाकडून खासगी रुग्णालयांना दिला जातो. या अर्जामध्ये रुग्णाला कधी भरती केले, उपचार कधीपासून चालू केले, त्याचे नाव-पत्ता, त्याची ऑक्सिजनची पातळी, रक्तचाचण्या, त्याचा स्कॅन रिपोर्ट, रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता, याविषयी तपशील भरून द्यायचा आहे. सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा तपशील महानगरपालिकेस मिळाल्यानंतर तो आरोग्य विभागाकडून समितीकडे पाठवला जाईल. रात्री १० वाजेपर्यंत हा अहवाल समितीकडे पोचल्यावर दुसर्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार कोणत्या पुरवठादाराकडून रेमडेसिविर इंजेक्शन मिळेल, याची हमी दिली जाईल. इतके सगळे असतांना खासगी आधुनिक वैद्यांकडून थेट रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून इंजेक्शन मिळवण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले जात आहे.