सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे रामनाथी आश्रमात करण्यात आलेल्या ‘श्रीराम यागा’च्या संदर्भात केलेल्या चाचण्या आणि त्यांचे विश्‍लेषण

यज्ञयागाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

२१ एप्रिल २०२१ या दिवशी रामनवमी आहे. त्यानिमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील महामृत्युयोग टळावा आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी सप्तर्षींच्या आज्ञेने (जीवनाडीपट्टीद्वारे सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्रीराम याग’ करण्यात आला. श्रीराम यागात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. नीलेश सिंगबाळ यांनी गुळवेल, सुंठ, काळीमिरी अन् सुकलेली पिंपळी या हविर्द्रव्यांची आहुती दिली. यज्ञात अर्पण केलेल्या हविर्द्रव्यांच्या ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ चाचणी संदर्भात काही प्रश्‍न आणि त्यांची सूक्ष्म ज्ञानातून मिळालेली उत्तरे पुढे देत आहोत.

कु. मधुरा भोसले

१. पहिल्या दिवशी हविर्द्रव्यांची केलेली निरीक्षणे आणि त्यांचे विश्‍लेषण

पहिल्या दिवशी श्रीराम यागात आहुती देण्यासाठी ३ तबकांमध्ये हविर्द्रव्ये मांडून ठेवली होती. या तिन्ही तबकांकडे परात्पर गुरु डॉक्टरांनी पहाण्यापूर्वी, त्यांना हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि केल्यानंतर अशी ३ टप्प्यांत तिन्ही तबकांतील हविर्द्रव्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

वरील सारणीतील निरीक्षणांच्या संदर्भात ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.

प्रियांका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘तबक क्र. १’ कडे पाहिल्यावर त्यातील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ ही अन्य दोन्ही तबकांच्या तुलनेत अनुमाने २० मीटरने कमी आहे. याचे कारण काय आहे ?

मधुरा : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तबकांकडे पाहिल्यावर त्यांच्या दृष्टीतून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे ‘तबक क्रमांक १’ मध्ये ईश्‍वराची इच्छाशक्ती, ‘तबक क्रमांक २’ मध्ये  ईश्‍वराची क्रियाशक्ती आणि ‘तबक क्रमांक ३’ मध्ये ईश्‍वराची ज्ञानशक्ती कार्यरत झाली होती. इच्छाशक्ती ही रज-सत्त्व प्रधान, क्रियाशक्ती सत्त्व-रज प्रधान आणि ज्ञानशक्ती ही सत्त्व प्रधान असते. ‘तबक क्र. १’ मध्ये कार्यरत झालेल्या इच्छाशक्तीमुळे या तबकाकडे वातावरणातील त्रासदायक स्पंदने आकृष्ट झाली होती. या तबकातील रजोगुणामुळे कार्यरत झालेल्या दैवी शक्तीशी तबकाकडे आकृष्ट झालेल्या त्रासदायक शक्तीशी सूक्ष्म युद्ध झाले आणि त्यानंतर त्रासदायक शक्ती नष्ट झाली. वाईट शक्तीच्या स्पंदनांशी सूक्ष्म युद्ध करण्यात ‘तबक क्र. १’ मधील सात्त्विक शक्ती व्यय झाल्याने या तबकातील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ ही अन्य दोन्ही तबकांच्या तुलनेत अनुमाने २० मीटरने कमी झाली.

प्रियांका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केल्यानंतर ‘तबक क्र. १’ हे ‘यू.ए.एस्.’ चाचणीसाठी नेतांना गाडीत पडले होते’, असे एका साधकाने सांगितले. त्या वेळी सूक्ष्मातून या तबकाच्या संदर्भात काय प्रक्रिया झाली ?

मधुरा : ‘तबक क्र. १’ मधील इच्छाशक्तीशी वातावरणातून आकृष्ट झालेल्या त्रासदायक शक्तीचे सूक्ष्म युद्ध चालू होते. वाईट शक्तींना या तबकातील हविर्द्रव्यात त्रासदायक शक्ती साठवायची होती आणि यज्ञातून संपूर्ण वातावरणात नकारात्मक ऊर्जा कार्यरत करायची होती. त्यामुळे त्या तबकावर सूक्ष्मातून आक्रमण करत होत्या. त्यांनी केलेल्या आक्रमणामुळेच ‘तबक क्र. १’ हे ‘यू.ए.एस्.’ चाचणीसाठी नेतांना गाडीत पडले. तबक क्र. १ खाली पडल्यामुळे त्यावर त्रासदायक शक्तींचे विरळ आवरण आले होते; परंतु या तबकाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पर्श केल्यामुळे त्यामध्ये कार्यरत झालेल्या चैतन्याचे वातावरणात प्रक्षेपण झाले. त्यामुळे तबकाच्या भोवती आलेले विरळ आवरण नष्ट झाले आणि तबकातून सात्त्विक स्पंदनांचे प्रक्षेपण चालू झाले.

प्रियांका :  परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या हस्तस्पर्शानंतर ‘तबक क्र. १’ यातील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ ही अन्य दोन्ही तबकांच्या तुलनेत अनुमाने ३५ मीटरने कमी आहे. याचे कारण काय आहे ?

मधुरा : ‘तबक क्र. १’ कडे साधकांना त्रास देणार्‍या वाईट शक्तीची स्पंदने आकृष्ट झाल्यामुळे ते तबक त्रासदायक स्पंदनांनी भारित झाले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या तबकाला स्पर्श केल्यामुळे त्यांच्या हातातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्यामुळे ‘तबक क्र. १’ मधील हविर्द्रव्यांकडे आकृष्ट झालेली त्रासदायक त्रासदायक शक्ती नष्ट झाली. या सूक्ष्म प्रक्रियेत तबकाकडे आकृष्ट झालेल्या सात्त्विक शक्तीचा व्यय झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या हस्तस्पर्शानंतर ‘तबक क्र. १’ यातील सकारात्मक ऊर्जेत झालेली वाढ ही अन्य दोन्ही तबकांच्या तुलनेत अनुमाने ३५ मीटरने कमी आहे.

२. दुसर्‍या दिवशी हविर्द्रव्यांची केलेली निरीक्षणे आणि त्यांचे विश्‍लेषण

दुसर्‍या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आहुती देण्यासाठीच्या हविर्द्रव्यांना हस्तस्पर्श करण्यापूर्वी, ‘श्री रामचंद्राय नम: ।’ हा नामजप करत हस्तस्पर्श केल्यानंतर, तसेच नामजप न करता हस्तस्पर्श केल्यानंतर हविर्द्रव्यांची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.

वरील सारणीतील निरीक्षणांच्या संदर्भात कु. प्रियांका लोटलीकर यांनी विचारलेला प्रश्‍न आणि त्यांना सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांनी दिलेली उत्तर पुढीलप्रमाणे आहेत.

प्रियांका : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हविर्द्रव्यांना नामजप करत हस्तस्पर्श करण्यापेक्षा नामजप न करता हस्तस्पर्श केल्याने हविर्द्रव्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ अधिक प्रमाणात वाढ झाली. याचे कारण काय आहे ?, तसेच या दोन्ही वेळी हस्तस्पर्श करतांना सूक्ष्मातून काय प्रक्रिया झाली ?

मधुरा : परात्पर गुरु डॉ. आठवले हे शिवात्मा-शिवदशेत असतात. ही अध्यात्मातील उच्चतम अवस्था आहे. या अवस्थेत त्यांच्या माध्यमातून श्रीविष्णूचे निर्गुण तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेला ‘श्री रामचंद्राय नम: ।’ हा नामजप परावाणीतील असला, तरी नामातील शक्तीला शब्दांचे बंधन होते. त्यामुळे या नामजपातून ७० टक्के निर्गुण आणि ३० टक्के सगुण स्तरावरील श्रीरामाचे चैतन्य कार्यरत झाले अन् ते त्यांच्या हस्तस्पर्शातून तबकाकडे प्रक्षेपित झाली. जेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नामजप न करता तबकाला स्पर्श केला, तेव्हा त्यांच्यामध्ये शब्दांच्या पलीकडील म्हणजे, आकाशतत्त्वापेक्षाही सूक्ष्म असणारे निर्गुण विष्णुतत्त्व ९० टक्के आणि सगुण विष्णुतत्त्व केवळ १० टक्के इतक्या प्रमाणात कार्यरत झाले. त्यामुळे त्यांनी नामजप न करता तबकाला स्पर्श केल्यावर त्यामध्ये अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा कार्यरत झाली.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२१ रात्री ११.१२)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.