बुलढाणा येथे शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद; एकमेकांना मारहाण !

पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट

बुलढाणा – येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी १८ एप्रिल या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात कोरोनाविषयी  वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचदिवशी या वक्तव्याच्या निषेधार्थ शहरातील जयस्तंभ चौक येथे भाजपचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. त्या वेळी संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि त्यांचे सहकारी यांनी त्यांना विरोध केला. या वेळी शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रथम वाद आणि नंतर हाणामारी झाली. भाजपचे नेते आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांसह ३ जण किरकोळ घायाळ झाले आहेत.

या घटनेनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत. पोलीस प्रशासनाकडून दोन्ही पक्षांच्या विरोधात संचारबंदीचा भंग तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायदा यांचा आधार घेत गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी माहिती ठाणेदार प्रदीप साळुंके यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड आणि इतर पोलीस अधिकारी यांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते.

मारहाणीच्या घटनेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तर बुलढाणा येथील भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण दिसून येते.

संजय गायकवाड यांनी कोणते वादग्रस्त वक्तव्य केले होते ?

आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनाच्या संदर्भात भाजप करत असलेल्या राजकारणाच्या विरोधात म्हणाले, ‘‘कोरोनाचे विषाणू सापडले, तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात टाकले असते.’’ असे बोलून त्यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती.