अमरावती मध्यवर्ती बस स्थानक बंद !

प्रतीकात्मक छायाचित्र

अमरावती – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. या कारणास्तव शहरातील मध्यवर्ती बसस्थानक १७ एप्रिल या दिवशी बंद करण्यात आले. प्रशासनाने सकाळी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांना बाहेर काढून बस स्थानकाच्या दोन्ही दारांवर ‘बॅरिकेड्स’ लावले.

राज्य शासनाने संचारबंदी घोषित केली असतांना बस सेवा चालू ठेवली; मात्र २ दिवस येथील बस स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली होती. शहरात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ सहस्रांवर पोचली आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने राज्य परिवहन मंडळाने बस स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला. अकोला येथून नागपूरला जाणार्‍या किंवा नागपूर येथून अकोला, बुलढाणा, संभाजीनगर येथे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या बसगाड्या येथील बस स्थानकावर येतात.

अत्यावश्यक सेवेसाठीच्या बसगाड्या येथील बस स्थानकावरून ये-जा करत आहेत. बस स्थानकावरून प्रवाशांना बाहेर काढल्यावर प्रवाशांनी रस्त्यावर गर्दी केली. वृद्धांपासून लहान मुलांचा यात समावेश होता. बस स्थानकासमोरील गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी ध्वनीक्षेपकाद्वारे आवाहन करून लोकांना रस्ता मोकळा करण्यास सांगितले.