महाराष्ट्रासाठी १ सहस्र १२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री

पुणे – महाराष्ट्रामध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी व्हेंटिलेटर सहज उपलब्ध होत नाहीत. महाराष्ट्रासाठी येत्या ३ ते ४ दिवसांत १ सहस्र १२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले जातील. ‘नॅशनल हेल्थ मिशन’च्या अंतर्गत आवश्यक मनुष्यबळासाठी केंद्र सरकार अर्थसाहाय्य करील. लसींचे नीट वितरण झाल्यास अडथळे दूर होतील, असे केंद्रीय पर्यावरण आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले. कोरोना संदर्भातील आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ही वेळ आरोप-प्रत्यारोपांची नाही. तसेच जनतेच्या हितापेक्षा महत्त्वाचे दुसरे काही नाही. त्यामुळे यावर राजकारण करणार नाही. महाराष्ट्रासाठी गुजरातहून ७००, तर आंध्रप्रदेशमधून ४२१ व्हेंटिलेटर्स उपलब्ध होतील. राऊरकेलासह अन्य ठिकाणांहूनही ऑक्सिजन मागवण्यात येईल. कोरोनासाठी आवश्यक असणारे ‘टेस्टिंग’, ‘ट्रॅकिंग’, ‘ट्रेसिंग’ आणि ‘ट्रिटमेंट’ यांसाठी आवश्यक मनुष्यबळ देण्यास केंद्र सरकार ‘नॅशनल हेल्थ मिशन’मधून निधी पुरवेल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.