वेंगुर्ले येथे भुयारी विद्युतीकरणासाठी खोदण्यात आलेले चर न बुजवल्याने अपघातांत वाढ

८ दिवसांत चर न बुजवल्यास या चरांमध्ये वृक्षारोपण करण्याची भाजपची चेतावणी

प्रतिकात्मक चित्र

वेंगुर्ले – शहरातून जाणार्‍या रेडी-रेवस मार्गावरील बसस्थानक ते निमुसगा या भागात ठिकठिकाणी भुयारी विद्युतीकरणासाठी चर खोदण्यात आले आहेत. या विद्युतीकरणासाठी भूमीगत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होऊनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खोदण्यात आलेले चर कायमस्वरूपी बुजवण्यात न आल्याने सातत्याने अपघात होत आहेत. तक्रार केल्यावर तात्पुरती माती टाकून चर बुजवण्याचे करण्याचे काम संबंधित खाते करत आहे. पुढील ८ दिवसांत हे चर कायमस्वरूपी डांबरीकरण करून न बुजवल्यास भाजपच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध म्हणून रस्त्यावरील चरांमध्ये वृक्षारोपण करण्याची चेतावणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिली आहे.

भूमीगत विद्युतवाहिनी टाकणार्‍या ठेकेदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय दराने रस्ता खोदाईचे पैसे भरून घेऊनच अनुमती दिली आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ते चर डांबरीकरण करून बुजवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे वारंवार दुचाकी घसरून अपघात होत आहेत; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजून डोळे उघडत नाहीत, अशी टीका भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी या निवेदनातून केली आहे.