दळणवळण बंदीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्‍यांत असंतोष

राज्यात दळणवळण बंदीचा व्यापार्‍यांकडून विरोध

सिंधुदुर्ग – राज्य सरकारने काही प्रमाणात दळणवळण बंदीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार्‍यांकडून विरोध होत आहे.

देवगड – देवगड शहरात पोलिसांकडून दळणवळण बंदीची कार्यवाही चालू करण्यात आली आहे. शहरातील व्यापार्‍यांना दळणवळण बंदीविषयी माहिती नसल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे व्यापार्‍यांनी ‘या दळणवळण बंदीला आमचा विरोध असून पोलिसांना गुन्हे नोंद करायचे असतील, तर त्यांनी ते करावेत; मात्र आम्ही आमची दुकाने उघडणार’, असा पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी ‘दळणवळण बंदीच्या आदेशाची कार्यवाही केली जाणारच आहे. व्यापार्‍यांना जर आदेश समजला नसेल, तर एक दिवस वाट पाहू; मात्र पुढील २ दिवसांत गुन्हे नोंद करू’, असे व्यापारी संघाच्या पदाधिकार्‍यांना सांगितले.

कणकवली – येथे व्यापारी, पोलीस, नगराध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत व्यापार्‍यांनी ‘हे मिनी लॉकडाऊन (दळणवळण बंदी) नसून पूर्ण लॉकडाऊन आहे’, असा आरोप केला. सोमवार ते शुक्रवार दुकाने चालू ठेवतो आणि शनिवार अन् रविवार हे दोन दिवस पूर्ण दळणवळण बंदीचे नियम पाळतो, अशी भूमिका व्यापार्‍यांनी मांडली. त्यानंतर ‘नगरपंचायत, पोलीस आणि जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही होईल’, असे पोलीस निरीक्षक अजुमद्दीन मुल्ला आणि नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी संगितले.

मालवण – दळणवळण बंदीमध्ये सलून (केशकर्तनालय) व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिल्याने नाभिक समाजात तीव्र स्वरूपात अप्रसन्नता आहे. त्यांनी तहसीलदार आणि नगराध्यक्ष यांची भेट घेऊन केशकर्तनालय चालू करण्याची मागणी केली.