परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – ‘बारमधून पैसे गोळा करा’, असे गृहमंत्र्यांनी बोलणे लांच्छनास्पद आहे. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये चालणारा बाजार नवीन नाही. परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? स्थानांतर झाले नसते, तर हा साक्षात्कार झाला नसता का ? असा प्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ एप्रिल या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

या वेळी राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ? कुणीतरी सांगितल्याविना पोलीस असे कृत्य करणार नाहीत. अनिल देशमुख यांचे अन्वेषण होईलच; पण ही गाडी कुणाच्या सांगण्यावरून ठेवली, याचे अन्वेषण व्हावे.’’

मनसेच्या कार्यकर्त्याच्या हत्येमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आल्याप्रकरणी शरद पवार यांची भेट घेणार

मनसेचे जमील शेख यांच्या हत्येमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नजीर मुल्ला यांचे नाव आले आहे. सत्ताधारी पक्षातील माणसे दिवसाढवळ्या हत्या करत आहेत. आमचे हातही बांधलेले नाहीत. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा गोष्टी योग्य नाहीत. याविषयी मी लवकरच शरद पवार यांची भेट घेणार आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत उपस्थित केलेली सूत्रे

१. बाहेरच्या राज्यांतून नियमित येणारी माणसे आणि महाराष्ट्रात रुग्णांची होत असलेली मोजणी यांमुळे रुग्ण वाढलेले दिसत आहेत.

२. छोट्या कारखानदारांना उत्पादन करायला शासनाने अनुमती दिली आहे; मात्र ‘विक्री करू नये’, असे सांगितले आहे. असे असेल, तर उत्पादन केलेला माल ठेवायचा कुठे ? त्यामुळे आठवड्यातून किमान २-३ दिवस दुकाने उघडण्याची मुभा देण्यात यावी.

३. नागरिकांकडून कर्जाचे हप्ते घेण्यासाठी बळजोरी केली जात आहे. याविषयी शासनाने अधिकोषांशी चर्चा करायला हवी. वीजदेयकांमध्ये शासनाने नागरिकांना दिलासा द्यायला हवा. लोकांना दिलासा देणे आवश्यक आहे.

४. सतत दळणवळण बंदी योग्य नाही.

५. कोरोनाच्या कालावधीत ज्या कंत्राटी कामगारांना राज्यशासनाने घेतले होते, त्यांना शासनाने सेवेत घ्यायाला हवे.

६. शेतकर्‍यांसाठी हमीभाव दिला पाहिजे. शेतकरी कोसळला, तर संकटामध्ये आणखी वाढ होईल.

७. इयत्ता १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांनाही शासनाने पुढच्या इयत्तेमध्ये घालावे.