सात्विक, धर्माचरणी वृत्ती असलेले आणि मृत्यूत्तर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले पनवेल येथील कै. सदाशिव बापू साळुंखे !

८.९.२०२० (भाद्रपद कृष्ण पक्ष षष्ठी) या दिवशी कै. सदाशिव बापू साळुंखे यांचे तिसरे वर्षश्राद्ध झाले. त्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. ही आनंदवार्ता ऐकल्यावर त्यांची कन्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार, जावई श्री. अतुल, पत्नी श्रीमती पुष्पा आणि मुलगा श्री. सचिन यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

कै. सदाशिव बापू साळुंखे
कै. सदाशिव बापू साळुंखे

१. पू. (सौ.) अश्‍विनी पवार (मुलगी), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

१ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘बाबांना कोणतीही गोष्ट एकदा सांगितल्यावर ती त्यांच्या कायमची स्मरणात रहात असे. ते आम्हाला त्यांच्या शाळेतील कविता, श्‍लोक आदी वयाच्या ५० ते ५५ वर्षांपर्यंत म्हणून दाखवत.

१ आ. व्यायामाची आवड : बाबा रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचे. ते प्रतिदिन व्यायाम करायचे. ते आमच्या व्यायामाकडे लक्ष ठेवत. त्यांना ‘आमचे शरीर सुदृढ असायला हवे’, असे वाटायचे.

१ इ. काटकसरी : त्यांनी आमच्यासाठी खेळणी किंवा मौजमजेच्या वस्तू कधीच घेतल्या नाहीत. आम्ही त्यांच्याकडे काही अनावश्यक गोष्टी मागितल्यास ते म्हणायचे, ‘‘तुमचे अनावश्यक लाड करण्यासाठी मी पैसे व्यय करणार नाही. तुम्ही शिका, कमवा आणि तुमचे तुम्ही घ्या.’’ त्यांनी आमच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देतांना त्या चांगल्या गुणवत्तेच्या दिल्या.

१ ई. वाचनाची आवड : बाबांना वाचनाची आवड होती. ते बोलतांना सहजतेने श्‍लोक आणि अभंग म्हणायचे. ते प्रतिदिन ज्ञानेश्‍वरी आणि संत तुकाराम महाराज यांचे अभंग वाचून झोपायचे. त्यांनी वायफळ गोष्टी वाचण्यात कधी वेळ घालवला नाही.

१ उ. सात्विक वृत्ती आणि धर्माचरणी

१. मी शाळेत असतांना माझे केस लांब झाल्यावर आई मला सौंदर्य वर्धनालयामध्ये (ब्यूटी पार्लरमध्ये) नेऊन माझे केस कापून आणत असे. बाबांना ते आवडत नसे. ते मला म्हणायचे, ‘‘लांब केस’ हे सौंदर्य आहे. आता यापुढे केस कापायला नकोत.’’

२. मी शाळा-महाविद्यालयात शिकत असतांना माझ्या मैत्रिणी पाश्चात्य पद्धतीचा पोशाख घालायच्या. बाबांनी मला तसे कपडे कधीच घालू दिले नाहीत आणि असा पोशाख करणार्‍यांचे समर्थनही केले नाही.

३. त्यांनी जवळ पैसे असूनही त्याचा कधी दिखावा केला नाही. ते साधी रहाणीच पसंत करत. ते म्हणत, ‘‘वेश असावा बावळा, परी अंगी नाना कळा ।’’ त्यांनी आमच्या मनावर ‘साधी रहाणी अन् उच्च विचारसरणी !’ हे तत्व लहानपणीच बिंबवले होते.

१ ऊ. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे सांगितल्यावर त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहून ‘तू पुढच्या वेळी चांगला अभ्यास कर’, असे सांगून धीर देणे : मी शालेय अभ्यासक्रमात हुशार होते. मला शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षेत कायम चांगले गुण मिळायचे. मी महाविद्यालयात शिकत असतांना एकदा सेवेकडे अधिक लक्ष दिले आणि अभ्यास केला नाही. त्यामुळे एका चाचणी परीक्षेत मी गणित विषयात अनुत्तीर्ण झाले. मी प्रथमच अनुत्तीर्ण झाले होते. मला त्याचा पुष्कळ ताण येऊन आता ‘बाबांना कसे सांगायचे ?’, हा प्रश्‍न पडला होता. मी घाबरतच त्यांना अनुत्तीर्ण झाल्याचे सांगितले. त्या वेळी ते मला म्हणाले, ‘‘तू नेहमी चांगले गुण मिळण्याचा अनुभव घेतला आहेस. तुला कधीतरी अनुत्तीर्ण होण्याचा अनुभवही मिळाला. तू पुढच्या वेळी चांगला अभ्यास कर.’’

१ ए. स्वतःच्या मुलांचा अभिमान असणे : बाबा लहानपणापासून मला ‘ताई’ असे संबोधायचे. ते क्वचितच कधीतरी मला ‘अश्‍विनी’ म्हणाले असतील ! त्यांना लहानपणापासूनच माझ्यातील गुणांविषयी आदर होता. मी सांगितलेल्या अनेक गोष्टी ते ऐकायचे. त्यांना आपल्या दोन्ही मुलांचा अभिमान होता. ते म्हणायचे, ‘‘माझी मुले समाजातील मुलांपेक्षा वेगळी आहेत. चित्रपटाला जाणे, पार्टी करणे, यांपेक्षा ते काहीतरी चांगले करतात.’’

१ ऐ. सैनिक आणि शेतकरी करत असलेल्या कष्टांची जाणीव असणे : आम्ही कधी ‘उन्हाळ्यात ऊन पुष्कळ लागते किंवा थंडीत थंडी वाजते’, असे म्हटल्यावर बाबा म्हणायचे, ‘‘सीमेवरच्या सैनिकाला किती ऊन आणि थंडी लागत असेल ! आपल्या देशातील शेतकर्‍याला दिवसभर ऊन किंवा थंडी या हवामानातच काम करायला लागते. आपण शेतकर्‍याची मुले आहोत. आपण आपले शरीर भक्कम करायला हवे.’’

१ ओ. समाजात लोकप्रिय असणे : बाबांच्या अनेक लोकांशी ओळखी होत्या. ते येता-जाता सर्वांशी बोलायचे. रस्त्यावरील केर काढणारी व्यक्ती असो, कुठला शिपाई असो किंवा कुणी नगरसेवक, पोलीस, एखाद्या आस्थापनाचा मालक असो, त्यांच्या ओळखीने अनेक व्यक्तींची कामे व्हायची.

त्यांंच्या निधनानंतर विविध ठिकाणांहून समाजातील अनेक व्यक्ती आल्या होत्या. तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी एकच वाक्य होते, ‘‘आबांनी आम्हाला पुष्कळ साहाय्य केले आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत.’’

१ औ. देवाप्रती श्रद्धा : ते कुटुंबासाठी न्यूनतम व्यय करायचे आणि इतरांसाठी अधिक व्यय करायचे. त्या वेळी ते म्हणायचे, ‘‘माझ्या मुलांचे देव बघेल !’’

२. श्री. अतुल पवार (जावई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. साधनेची आवड : माझ्या सासर्‍यांचा मूळ पिंड साधनेचा होता. सासर्‍यांचे निधन झाल्यानंतर योगतज्ञ दादाजी वैशंपायन म्हणाले, ‘‘त्यांना पुढची गती मिळेल.’’ ते नामजप आणि सेवा करण्यासाठी आश्रमात यायचे.

३. श्रीमती पुष्पा सदाशिव साळुंखे (पत्नी), पनवेल

३ अ. सेवाभावी वृत्ती असल्याने इतरांचा विचार करणे

१. यजमानांना सतत अन्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना आर्थिक साहाय्य करणे अन् अन्यांसाठी जगणे आवडत असे. समाजातील काही व्यक्ती आम्हाला सांगायच्या, ‘‘आबांमुळे (कै. सदाशिव साळुंखे यांच्यामुळे) आमचा संसार चालला आहे.’’

२. यजमान जेवायला बसले आणि कुणी आले, तर ते त्यांना जेवायला बसवायचे. त्या वेळी ‘स्वयंपाक किती आहे ?’, हेही पहायचे नाहीत. ते वेळप्रसंगी स्वतःच्या ताटातील जेवणही द्यायचे.

३. त्यांच्यात मुळातच अहं अल्प असल्याने ते सर्वांशी स्वतःहून बोलायचे आणि त्यांची विचारपूस करायचे.

४. कुणाचा पाय मुरगळला असेल, तर यजमानांमधील दैवी गुणामुळे ते मुरगळा काढत असत, तसेच चमक भरली असेल, तर तीही निघत असे. त्यांच्याकडे बरेच लोक मर्दन करून घ्यायला यायचे. यजमानांनी लोकांना मर्दन केले की, संबंधितांना लगेचच बरे वाटत असे. काही वेळा सकाळी ७ – ७.३० वाजता घरी लोक आल्यास यजमान त्यांना सेवाभावाने मर्दन करायचे.

३ आ. धार्मिक वृत्ती

१. यजमानांना पहिल्यापासूनच देवाची आवड होती. ते लग्नाआधीपासूनच भजन-कीर्तनाला जात होते. त्यांच्यात देवाप्रती भोळाभाव होता. त्यांना तीर्थयात्रा करणे आणि दान देणे, यांची पुष्कळ आवड होती. ते तीर्थक्षेत्री जाऊन आल्यावर ४ – ६ दिवस त्याच विचारांत आणि भावावस्थेत रहायचे. त्यांना चित्रपट किंवा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्याची आवड नव्हती.

२. ते अनेक वर्षे श्रावण मासात नवनाथांच्या पोथीचे वाचन करायचे. ते माळकरी असल्याने तुळशीला नियमित पाणी घालून नमस्कार करायचे. ते प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला आणि कार्तिकी एकादशीला आळंदीला जायचे.

३. एकदा आम्ही एका तीर्थक्षेत्री काही धार्मिक विधी करायला गेलो होतो. तेव्हा तेथील भ्रष्टाचार पाहून यजमानांनी तेथे अर्पण न करता सनातन संस्थेला अर्पण दिले.

४. आम्ही रहात असलेल्या वसाहतीतील व्यक्तींकडे जाऊन ते सेवा म्हणून अर्पण गोळा करायचे.

५. ते धार्मिक सप्ताहाच्या वेळी ७ दिवस सेवेला जायचे. त्या वेळी कुणी काही विचारले, तर ‘विठ्ठलासाठी करतो’, असे सांगायचे.

३ इ. कन्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्याप्रती भाव

३ इ १. कन्या संतपदी विराजमान झाल्याचा पुष्कळ आनंद होणे आणि ती संत झाल्याची वार्ता असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ गावाला नेऊन तेथील लोकांना ते वाचून दाखवणे : कन्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार संतपदी विराजमान झाल्याचा त्यांना पुष्कळ आनंद झाला होता. ती संत झाल्याची वार्ता असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ यजमान गावाला घेऊन गेले. तेथील लोकांना वाचता येत नसल्याने यजमानांनी लोकांना ते वाचून दाखवले.

३ इ २. समाजातील व्यक्ती आणि नातेवाईक यांना ‘माझी मुलगी अन् कुटुंबीय यांना समजून घेण्यात न्यून पडलो’, याविषयी प्रांजळपणे सांगणे : कन्या पू. (सौ.) अश्‍विनी संतपदी विराजमान झाल्यावर यजमान समाजातील व्यक्ती आणि नातेवाईक यांना ‘माझी मुलगी आणि कुटुंबीय साधना करत असूनही त्यांना समजून घेण्यात मी न्यून पडलो’, असे प्रांजळपणे सांगायचे. त्यांचे मन मोठे होते. ते कधी चुकले, तर त्याविषयी सहजपणे सांगायचे. ‘त्यांना आपण चुकलो’, याची पुष्कळ खंत वाटायची.

३ इ ३. सहनशील वृत्ती : ‘आमची मुलगी (पू. (सौ.) अश्‍विनी पवार) सनातन संस्थेच्या देवद आश्रमात रहाते’, याविषयी यजमानांचे मित्र आणि नातेवाईक त्यांना बोलायचे. त्याचा यजमानांंना त्रासही व्हायचा; पण त्यांनी तो सहन केला.

३ इ ४. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार करत असलेली साधना : ते वारकरी संप्रदायानुसार साधना करायचे; पण अन्यांंना ते ‘कुलदेवता आणि दत्तगुरु यांचे नाम घ्या’, असे सांगायचे. ते ‘देवघराची मांडणी कशी करायची ?’, याविषयीही सांगायचे. ते नियमितपणे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायचे आणि झोपतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ छातीवर ठेवून झोपायचे. त्यांचा सनातन संस्थेप्रती भाव होता.

‘हे गुरुमाऊली, मी यजमानांचे गुण पहाण्यात न्यून पडले. मी आपली आणि त्यांची अपराधी आहे. केवळ आपल्याच कृपेने यजमानांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली. त्याविषयी मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’

४. श्री. सचिन सदाशिव साळुंखे (मुलगा), पनवेल

४ अ. साधे रहाणीमान : बाबांच्या मालकीचे सोन्या-चांदीचे दुकान असूनही त्यांचे रहाणीमान अतिशय साधे होते. तसे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून प्रतीत व्हायचे.

४ आ. धर्माचरणाची आवड : त्यांनी आमच्या लहानपणी आम्हाला कधीही मौजमजेच्या ठिकाणी अथवा उद्यानात नेले नाही. ते आम्हाला आवर्जून धार्मिक स्थळी न्यायचे.

४ इ. मुलाचा अभिमान असणे : मी सेवा झाल्यानंतर कधी पहाटे ३ – ४ वाजता घरी जायचो; पण बाबांनी माझा कधी राग केला नाही. ‘माझा मुलगा राष्ट्र-धर्म यांच्या कार्यात सहभागी आहेे’, याचा त्यांना अभिमान वाटायचा.

४ ई. इतरांचे आधारस्तंभ असणे

१. गावी अथवा मित्रपरिवारात कुणाचे भांडण अथवा वितुष्ट असल्यास बाबा ते सहजतेने सोडवायचे. नंतर बाबा त्यांच्यात एकोपा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे. गावातील भावकी, तसेच मित्र यांना बाबांचा आधार वाटायचा.

२. अनेक जणांचे मोडत असलेले संसार बाबांनी मध्यस्थी करून पुन्हा नव्याने चालू करून दिले आहेत.

३. श्रीमहामंडलेश्‍वरस्वामी, तसेच श्री आबानंदगिरी महाराज यांचे बाबांवर पुष्कळ प्रेम होते. समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी बाबा त्यांना हक्काने महाराजांकडे घेऊन जायचे.

४ उ. पांडुरंगाप्रती असलेला भाव : एकदा आम्ही चारचाकी गाडीतून सोलापूरहून सांगलीला जात होतो. तेव्हा त्यांना एक वयस्कर व्यक्ती हातात भगवी पताका घेऊन भर उन्हात अनवाणी चालत पंढरपूरला जातांना दिसली. बाबांनी त्याच क्षणी चारचाकी गाडी थांबवायला सांगून त्या व्यक्तीला गाडीत घेतले आणि पंढरपूरला नेऊन सोडले. त्या वेळी बाबांचा ‘त्या व्यक्तीच्या रूपात पांडुरंगच गाडीत बसला होता’, असा भाव होता.

ते वारीला जातांना वारकर्‍यांना देण्यासाठी भरपूर खजूर, वेफर्स आणि चिवडा इत्यादी घेऊन जायचे.