सर्वांना प्रेमाने आपलेसे करणार्‍या पुणे येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) निर्मला दाते यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या देहात झालेले दैवी पालट !

‘पुणे येथील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींमुळे त्यांचे सर्व कुटुंब पूर्ण वेळ झाले. त्यांचे घर म्हणजेच पुण्यातील एक आश्रम झाला. मीही पुण्यात गेलो की, त्यांच्या घरीच रहात होतो. त्या वेळी पू. आजी पुष्कळ भावपूर्ण आणि मायेने सर्व करायच्या. पू. आजींचा सर्वांनाच आधार वाटत होता आणि आजही वाटतो. १५.३.२०१५ या दिवशी आजी संतपदाला पोचल्या. ‘वर्ष १९९३ मध्ये, म्हणजे संत होण्यापूर्वी पू. दातेआजी यांनी कशी सेवा केली ? त्यांची साधनेतील वाटचाल कशी झाली ?’, हे पू. आजींविषयीच्या या लिखाणातून लक्षात येते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पू. (श्रीमती) निर्मला दाते

अशा या घराला विश्‍वासाचा किनारा ।

श्रीमती अनुराधा पेंडसे

नाही भेदभाव जिथे असे लळा-जिव्हाळा ।
अशा या घराचा लाभतो किनारा ॥

सामावून घेते सकल जनांना ।
सान-थोर, गरीब-धनवान आदींना मिळतो दिलासा ॥ १ ॥

आपुलकीच्या धाग्यामध्ये मायेचा ओलावा ।
अतिथ्याचा दरवळ सुखावतो मानवा ॥

त्यागातच असे ऐश्‍वर्य संपदा ।
उरतच नसे पारावार आनंदा ॥ २ ॥

स्नेहाचे हे बंधन माणुसकीचा झरा ।
अशा या घराला विश्‍वासाचा किनारा ॥

मनाचीही शक्ती ईश्‍वराची भक्ती ।
नेईल पैलथडी (टीप) यथायोग्य रिती ॥ ३ ॥

ठेवून हे भान टिपले प्रसंगा ।
कौतुकाच्या वर्षावात उठले तरंग ॥

फेसाळत आल्या आठवणींच्या लाटा ।
त्यातच दिसती मोती-शंख-शिंपल्या ॥ ४ ॥

आयुष्याच्या वाटेवर सोबतही नामाची ।
त्यातच लाभते स्थैर्य आणि शांती ॥

त्याचीच कशी धरावी ही कास ।
उमजते तरी होईना ती पूर्ण ॥ ५ ॥

प्रयत्नांती परमेश्‍वर मिळेल ही खात्री ।
साधनेने केवळ मिळेल ही शक्ती ॥

तोच हा प्रयत्न चालू आहे सदा ।
यश मिळो त्यात देवा, हीच नम्र प्रार्थना ॥ ६ ॥

टीप – पलीकडचे तीर

– श्रीमती अनुराधा पेंडसे (पू. निर्मला दातेआजी यांची कन्या), पुणे (५.४.२०१७)


पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना प्रथम साधनेची आवड नसणे आणि नंतर त्या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन कृतीशील होणे

१. ‘आरंभी सौ. दाते यांना साधनेची आवड नव्हती.

२. त्या सांगली येथील सत्संगानंतर झालेल्या बैठकीसाठी थांबल्या. नंतर पुण्यातही बैठकीत आणि चर्चेत भाग घेऊ लागल्या. त्यानंतर त्यांच्या घरी सत्संग चालू केला.

३. त्यांनी मुंबईतील सत्संगाच्या वेळी स्वयंपाकघरात पुष्कळ साहाय्य (सेवा) केले.

४. ‘आता प्रवचन (लेक्चर) देण्यासाठी तयारी करीन’, असे म्हणाल्या.

५. साधिकेला तिच्या मनाप्रमाणे सेवा मिळणे : सौ. दाते जेवणाच्या समितीमध्ये होत्या; पण त्यांना सारखे वाटायचे की, आपले नाव ‘उद्घोषणा’ समितीमध्ये (अनाउन्समेंटमध्ये) असावे आणि तसेच झाले. पुढे त्यांना उद्घोषणेची सेवा मिळाली.’

– एक साधक (९.५.१९९३)

(हे लिखाण पूर्वीचे असल्यामुळे पू. (श्रीमती) निर्मला दाते यांचा उल्लेख ‘सौ. दाते’ असा केला आहे. – संकलक)


पू. निर्मला दातेआजी म्हणजे निर्मळ अन् नितळ प्रीतीचा झरा ।

‘पुणे येथील पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी फोंडा, गोवा येथे आल्याचे समजल्यावर देवाने मला पुढील ओळी सुचवल्या. ‘पू. दातेआजींनी पुण्यातील, तसेच धर्मप्रसार आणि अन्य कारणांसाठी पुणे येथे आलेल्या सर्व साधकांशी प्रेमभावाने कशी जवळीक साधली आहे’, याचे मला स्मरण झाले अन् कृतज्ञता वाटली.

पू. आजी, निर्मळ अन् नितळ अपुला प्रीतीचा झरा ।
वाहूनी अखंड गुरुदेवांसह साधकांशी जोडले भावबंध ॥ १ ॥

दर्शना आपुल्या आतुर भूलोकातील वैकुंठ ।
प्रीतीसागरात रामनाथी आश्रमही डुंबेल आकंठ ॥ २ ॥

पू. दातेआजींच्या पावन चरणी सनातन परिवाराचा साष्टांग नमस्कार !’

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२१)


पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींच्या देहात झालेले दैवी पालट !

‘मी गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे येथे गेलो असतांना ७.९.२०१९ या दिवशी माझी पू. (श्रीमती) निर्मला दातेआजींशी भेट झाली. त्या वेळी श्रीकृष्णकृपेने त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.

१. ‘पू. दातेआजींची त्वचा गुलाबी आणि पारदर्शक झाली आहे’, असे जाणवणे

मला पू. दातेआजींचे हात, चरण, तोंडवळा आणि डोळे या सर्व ठिकाणची त्वचा गुलाबी दिसत होती. त्यांचे हात आणि पाय यांची त्वचा मला पारदर्शक दिसत होती.

२. पू. दातेआजींतील ‘प्रीती’ या गुणामुळे सूक्ष्मातून दैवी सुगंध जाणवणे

पू. दातेआजींची त्वचा गुलाबी होण्यामागे त्यांच्यातील ‘प्रीती’ हा गुण मुख्य असल्याचे मला जाणवले. त्यामुळेच त्यांच्या भेटीच्या वेळी मला सूक्ष्मातून गुलाबाचा दैवी गंध येत होता. मला हा गंध अनुमाने १५ फुटांपर्यंत येत होता. मला त्यांच्यातील चैतन्य १५ फुटांपर्यंत जाणवत होते.’

– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०१९)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक