‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या वैश्‍विक आपत्काळामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

अध्यात्मशास्त्राविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या वैश्‍विक आपत्काळामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेनुसार केलेल्या आध्यात्मिक उपायासंदर्भात केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे २४ मार्च २०२० पासून भारतात सर्वत्र ‘दळणवळण बंदी’ लागू करण्यात आली. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करून सांगितले, ‘‘५.४.२०२० या रात्री ९ वाजता भारतियांनी त्यांच्या घरातील दिवे ९ मिनिटांसाठी बंद ठेवावेत आणि तेव्हा त्या कालावधीत तेलाचा दिवा प्रज्वलित करावा किंवा मेणबत्ती लावावी. तेही शक्य नसल्यास भ्रमणभाषमध्ये असलेला दिवा चालू करावा.’’ त्यानुसार सर्व देशवासियांनी केले.

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘सप्तर्षी जीवनाडी’चे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी पुढील उपाय करण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘५.४.२०२० या रात्री ९ वाजता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींनी मिळून एरंडेल तेलाचे ९ दिवे प्रज्वलित करावेत. हे ९ दिवे नवग्रहांसाठी प्रज्वलित करायचे आहेत. ‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या वैश्‍विक आपत्काळामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी हा उपाय करायचा आहे.’’ त्यानुसार सद्गुरुद्वयींनी ५.४.२०२० या रात्री ९ वाजता एरंडेल तेलाचे ९ दिवे प्रज्वलित केले. एरंडेल तेलाचे दिवे प्रज्वलित केल्यावर त्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

दीप प्रज्वलीत करतांना डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत एरंडेल तेलाच्या (नवग्रहांच्या) ९ दीपांना (मातीच्या पणत्यांना) परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श करण्यापूर्वी आणि त्यांनी हस्तस्पर्श केल्यानंतर, सद्गुरुद्वयींनी दीप प्रज्वलित केल्यानंतर अन् ते दीप शांत झाल्यानंतर (विझल्यानंतर) त्या सर्व दीपांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – चाचणीतील नवग्रहांच्या दीपांमध्ये ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत. चाचणीतील नवग्रहांच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पुढे दिली आहे.

१ अ १. चाचणीतील नवग्रहांच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ.

टीप १ – (२-१ =) ३. यातील २ म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर आणि १ म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दीपांना हस्तस्पर्श करण्यापूर्वी’

टीप २ – चाचणीस्थळाची जागा अपुरी पडल्याने दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २५ मीटरच्या पुढे मोजता आली नाही.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.

१. चाचणीतील सर्व दीपांमध्ये आरंभी सकारात्मक ऊर्जा होती.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रहांच्या दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर त्या सर्व दीपांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली; पण चाचणीतील अन्य दीपांच्या तुलनेत शनि, केतू, राहू आणि गुरु या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अधिक प्रमाणात वाढ झाली. (यामागील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३ ई’ मध्ये दिले आहे.)

३. सद्गुरुद्वयींनी दीप प्रज्वलित केल्यानंतर दीपांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. (चाचणीस्थळाची जागा अपुरी पडल्याने दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २५ मीटरच्या पुढे मोजता आली नाही.)

४. दीप शांत झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा होती; पण अन्य ग्रहांसाठीच्या दीपांच्या तुलनेत शुक्र, मंगळ, केतू आणि बुध या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक होती. (यामागील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३ उ’ मध्ये दिले आहे.)

श्री. राज कर्वे

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रहांच्या दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर त्यांच्यातील (दीपांतील) सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होण्यामागील कारण : ज्योतिषशास्त्रानुसार गत काही मासांपासून विशिष्ट ग्रहस्थिती सध्याच्या आपत्काळास पूरक बनली आहे. सप्तर्षींनी ‘कोरोना विषाणूं’मुळे निर्माण झालेल्या वैश्‍विक आपत्काळामध्ये नवग्रहांचे आशीर्वाद लाभावेत’, यासाठी हे दीप प्रज्वलित करण्यास सांगितले होते. ‘परात्पर गुरु’पदावरील समष्टी संतांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) नवग्रहांच्या दीपांना हस्तस्पर्श करून त्यांमध्ये चैतन्य संक्रमित केले; त्यामुळे त्यांना (दीपांना) त्यांचे कार्य करण्यासाठी आवश्यक बळ प्राप्त झाले. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर दीपांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नवग्रहांच्या दीपांना प्रज्वलित केल्यानंतर दीपांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होण्यामागील कारण : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी नवग्रहांना भावपूर्ण प्रार्थना करून ९ दीप अतिशय भावपूर्णरीत्या प्रज्वलित केले. त्यामुळे नवग्रहांच्या दीपांमध्ये नवग्रहांचे चैतन्य आकृष्ट होऊन ते कार्यरत झाले. त्यामुळे सद्गुरुद्वयींनी दीप प्रज्वलित केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

२ इ. दुसर्‍या दिवशी सकाळी दीप शांत झाल्यानंतरही (विझल्यानंतर) त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून येणे : सद्गुरुद्वयींनी ५.४.२०२० या रात्री ९ वाजता प्रज्वलित केलेले दीप दुसर्‍या दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत हळूहळू शांत झाले (दीप विझले). दीप शांत झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा असल्याचे चाचणीतून दिसून आले. याचे कारण – ‘दीपांना समष्टी संतांचा झालेला चैतन्यमय हस्तस्पर्श, नवग्रहांचे चैतन्य आकृष्ट करून ते प्रक्षेपित करण्याची त्यांची (दीपांची) क्षमता, तसेच सनातन आश्रमातील सात्त्विक वातावरण यांमुळे दीपांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत नवग्रहांचे दीप हळूहळू शांत झाले, तरी त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य टिकून होते; त्यामुळे त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली.

२ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रहांच्या दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर सर्व दीपांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे; पण अन्य ग्रहांसाठीच्या दीपांच्या तुलनेत शनि, केतू, राहू आणि गुरु या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ होणे, यामागील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण : ‘शनि, केतू, राहू आणि गुरु हे ग्रह समष्टीशी संबंधित ग्रह आहेत. मेदिनीय (राष्ट्राचे) भविष्य वर्तवतांना या ४ ग्रहांचा प्रामुख्याने विचार केला जातो; कारण हे ४ ग्रह मंद गतीने सूर्याभोवती भ्रमण करतात. शनि ग्रहाला एक राशीतून भ्रमण करण्यास अडीच वर्षे, राहू अन् केतू यांना प्रत्येकी दीड वर्षे आणि गुरु ग्रहाला ११ ते १२ मास लागतात. त्यामुळे मोठ्या सामाजिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी या ४ ग्रहांचा विचार प्रामुख्याने केला जातो. डिसेंबर २०१९ मधील शेवटच्या सप्ताहात कोरोना विषाणूंचा संसर्ग होण्यास आरंभ झाला. त्या वेळी शनि, केतू आणि गुरु ‘धनु’ राशीत एकत्र आले होते. या तिन्ही ग्रहांवर राहूची दृष्टी म्हणजे प्रभाव होता. हे अशुभ योग ‘कोरोना वैश्‍विक महामारी’ला कारणीभूत ठरले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवग्रहांच्या दीपांना हस्तस्पर्श केल्यानंतर सर्व दीपांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली; पण अन्य ग्रहांसाठीच्या दीपांच्या तुलनेत शनि, केतू, राहू आणि गुरु या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेत अधिक प्रमाणात वाढ झाली. यावरून लक्षात येते की, ‘शनि, केतू, राहू आणि गुरु या चारही ग्रहांचा अशुभ प्रभाव न्यून करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित दीपांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आवश्यक तेवढी सकारात्मक ऊर्जा संक्रमित केली.’

२ उ. दुसर्‍या दिवशी सकाळी दीप शांत झाल्यानंतरही (विझल्यानंतर) त्यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे; पण अन्य ग्रहांसाठीच्या दीपांच्या तुलनेत शुक्र, मंगळ, केतू अन् बुध या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असणे, यांमागील ज्योतिषशास्त्रीय विश्‍लेषण : शुक्र ग्रह ‘आनंद’, मंगळ ग्रह ‘पराक्रम-विजय’, बुध ग्रह ‘दळण-वळण’ आणि केतू ग्रह ‘तोडणे’ यांचे कारक आहेत. सद्यपरिस्थितीत ‘कोरोना महामारी’ची साखळी लवकरात लवकर तोडून तिचा नाश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; त्यामुळे मानवजातीवर आलेले संकट दूर होईल. ‘अन्य ग्रहांसाठीच्या दीपांच्या तुलनेत शुक्र, मंगळ, केतू अन् बुध या ग्रहांसाठीच्या दीपांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ अधिक असणे, हे ‘कोरोना महामारी’च्या विरुद्ध पुकारलेल्या युद्धात भारताला विजयश्री मिळून ‘कोरोना विषाणूं’चा समूळ नाश होणार’, याचे निर्देशक आहे.

२ ऊ. ५.४.२०२० या रात्री ९ वाजता दीप प्रज्वलित करण्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व : ५.४.२०२० या रात्री ९ वाजता ‘त्रयोदशी’ ही तिथी होती. त्रयोदशीला ‘जया’ ही संज्ञा आहे, अर्थात् ती विजय प्रदान करणारी तिथी आहे. वायूच्या माध्यमातून वेगाने पसरणार्‍या ‘कोरोना विषाणूं’चा संसर्ग न्यून करण्यासाठी, तसेच मानवाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तेजतत्त्व आणि पृथ्वीतत्त्व यांची आवश्यकता आहे. ५.४.२०२० या दिवशी चंद्र सिंह राशीत होता. सिंह ही क्षत्रिय वर्णाची (तेजतत्त्वाची) आणि स्थिर स्वभावाची (पृथ्वीतत्त्वाची) रास आहे, तसेच या रात्री ९ वाजता चंद्र ‘पूर्वाफाल्गुनी’ या तेजतत्त्वाच्या नक्षत्रात होता. या दिवशी रविवारही होता. यावरून लक्षात येते की, तेजतत्त्व आणि पृथ्वीतत्त्व यांचे आधिक्य असणार्‍या मुहूर्तावर सप्तर्षींनी नवग्रहांसाठी ९ दीप प्रज्वलित करण्यास सांगितले, तसेच संपूर्ण देशानेही त्या रात्री ९ वाजता दीप प्रज्वलित केले. त्यामुळे सूक्ष्म स्तरावर वातावरणातील तमोगुणाचा प्रभाव न्यून होण्यास साहाय्य झाले, तर स्थूल स्तरावर भारतियांमध्ये कोरोना विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असणारे आत्मबळ वृद्धिंगत झाले.’

– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा.

सौ. मधुरा कर्वे

३. आपत्काळातही विश्‍व कल्याणार्थ वेळावेळी नामजपादी उपाय सांगून मार्गदर्शन करणार्‍या थोर ऋषिमुनींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

३०.३.२०२० या दिवशी सकाळी ११ वाजता पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सप्तर्षींचा संदेश सांगितला. ते म्हणाले, ‘‘सप्तर्षींनी लगेचच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात दक्षिण आणि उत्तर दिशांना तोंड करून एकेक मातीची पणती ठेवायला सांगितली आहे. या पणत्या नेहमीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या घ्याव्यात. दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवायच्या पणतीमध्ये पाणी, थोडी हळदीची पूड आणि कडुनिंबाची ४ – ५ पाने असावीत. उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायच्या पणतीमध्ये एरंडेलाचे तेल आणि कापसाची वात असावी; पण ही वात प्रज्वलित करू नये. जोपर्यंत सप्तर्षींची पुढील आज्ञा येत नाही, तोपर्यंत या दोन्ही पणत्या अशाच ठेवाव्यात. पुढे एक शुभशकून आल्यावर याविषयी सप्तर्षि कळवतील.’’ (सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्वरित रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात दक्षिण आणि उत्तर दिशेला तोंड करून मातीची एकेक पणती ठेवली.)

३.४.२०२० या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधानांनी भारतियांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘या आधीच सप्तर्षींनी उत्तर दिशेकडे तोंड करून एरंडेल तेलाचा दिवा प्रज्वलित न करता ठेवायला का सांगितला होता, ते लक्षात आले असेल.’’ आणि त्यानंतर त्यांनी सप्तर्षींची पुढील आज्ञा सांगितली. यातून सप्तर्षींची सर्वज्ञता लक्षात येते. आपत्काळातही विश्‍वकल्याणार्थ वेळावेळी नामजपादी उपाय सांगून मार्गदर्शन करणार्‍या अशा थोर ऋषिमुनींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (६.४.२०२०)

ई-मेल : [email protected]

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक