सहजावस्थेत राहून साधकांवर प्रीती करणारे पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज

१. सहजता

‘पू. बांद्रे महाराज यांच्या वागण्या-बोलण्यात सहजता आहे. त्यांचे रहाणीमान साधे आहे.

२. प्रीती

त्यांच्या लिखाणाच्या संकलन सेवेच्या अंतर्गत समन्वय सेवा करतांना माझा भ्रमणभाषद्वारे त्यांच्याशी संपर्क होत असे. त्यांनी मला प्रत्यक्ष पाहिले नव्हते. ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांनी अनेक साधकांना विचारले, ‘‘अमोल कुठे आहे ? मला त्याला भेटायचे आहे.’’ आमचा फारसा संपर्क नसूनही त्यांना मला भेटायची पुष्कळ ओढ होती. मी त्यांना भेटल्यानंतर त्यांना पुष्कळ आनंद झाला. मी मास्क घालून त्यांना भेटलो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मास्क काढ. मला तुला नीट पहायचे आहे.’’ त्या वेळी मला त्यांच्यातील प्रीती जाणवली. संतच असे प्रेम करू शकतात. त्यांना आश्रम दाखवून निरोप देतांना त्यांनी माझ्या दोन्ही गालांवरून आणि डोक्यावरून पुष्कळ प्रेमाने हात फिरवला. ते मला म्हणाले, ‘‘तू मला मुलासारखाच आहेस.’’ तेव्हा मला पुष्कळ भरून आले.

श्री. अमोल बधाले

३. साधकांचे कौतुक करणे आणि आशीर्वाद देणे

ते साधकांना भेटल्यानंतर ‘तुम्ही पुष्कळ चांगले कार्य करत आहात. हे करणे सोपे नाही’, असे म्हणून साधकांचे कौतुक करत होते आणि ‘असेच करत रहा’, असा आशीर्वादही देत होते.

४. अहंशून्यता

अ. त्यांना पुष्कळ ज्ञान असूनही त्याविषयीचा अहं त्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवला नाही.

आ. त्यांना २६ वह्या भरतील, एवढे ज्ञान ईश्‍वराकडून मिळाले आहे. ते म्हणाले, ‘‘त्यात व्याकरणाच्या पुष्कळ चुका असतील. तुम्हाला अक्षर समजत नसेल. त्यातील तुम्हाला जेवढे घ्यावेसे वाटते, तेवढे घ्या.’’ ‘मला काही येत नाही’, असेच ते म्हणत होते.

५. त्यांच्या बोलण्यातून त्यांची ईश्‍वराविषयीची भक्ती जाणवत होती.

गुरुदेवांच्या कृपेमुळे मला पू. बांद्रे महाराज यांचे प्रेम अनुभवायला मिळाले. त्यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२१)


पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव !

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज म्हणाले,

१. ‘‘माझे महत्त्व काहीच नव्हते. गुरुदेवांनी मला मोठे केले. त्यांनी मला संत केले आणि मला सन्मान दिला. त्यांनीच मला प्रसिद्धी दिली. खरे संत तेच ओळखतात.

२. ‘मला ज्ञान देणारी शक्ती कोण आहे’, हे मला ठाऊक नव्हते. मी पुष्कळ वेळा विचारण्याचा प्रयत्न केला; पण उत्तर मिळाले नाही. गुरुदेवांमुळेच मला कळले, ‘‘तुमच्याशी ईश्‍वरच बोलत आहे.’’

३. कुणालाही एवढा मोठा आश्रम चालवणे शक्य नाही. अवतारी पुरुषच हे कार्य करू शकतात.

४. परात्पर गुरुदेव वर्ष २०२३ नंतर हरिश्‍चंद्राचे राज्य आणणार आहेत.’’ त्यांच्या बोलण्यातून परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ भाव जाणवत होता.

पू. (ह.भ.प) सखाराम बांद्रे महाराज यांनी रामनाथी आश्रमाविषयी काढलेले गौरवोद्गार !

१. ‘काशी देखी, द्वारका देखी, मथुरा देखी; परंतु गोवास्थित रामनाथी आश्रम नहीं देखा, तो उसने कुछ नहीं देखा ।

२. मी अनेक ठिकाणी फिरलो; पण रामनाथी आश्रमासारखा आश्रम कुठे पाहिला नाही. ४ व्यक्ती असलेल्या घरातही कुणी सामंजस्याने रहात नाही; मात्र रामनाथी आश्रमात अनेक साधक आनंदाने रहातात. ‘येथे एवढा आनंद कसा ?’, असा मला प्रश्‍न पडला. बाहेर कुठे असा आनंद नाही.

३. रामनाथी आश्रमातील स्वयंपाकघरासारखे स्वयंपाकघर देशात कुठेच नसेल. येथील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे.

४. मी एरव्ही बाहेर गेल्यास मला लगेच थकायला होते. मी ८ घंटे प्रवास करून आश्रमात आलो. येथे आश्रमात फिरलो; पण मला जराही थकवा जाणवला नाही. ‘मी १८ वर्षांचा तरुण झालो आहे’, असे मला वाटले. मी रामनाथी आश्रमात असतांना मला पुष्कळ उत्साह जाणवत आहे.

५. रामनाथी आश्रम पाहिल्यानंतर मी केदारनाथ यात्रेला जायचे ठरवले होते. आश्रमाला भेट दिल्यानंतर ‘येथेच सर्व तीर्थे आहेत’, असे मला वाटते. ‘रामनाथीची यात्रा केल्यावर आता मला एखादी यात्रा करावी’, असे वाटत नाही. त्यामुळे मी केदारनाथला जाण्याचे रहित केले. रामनाथी आश्रमात सर्वकाही आहे. हे वैकुंठ आहे.’’

– श्री. अमोल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.३.२०२१)

या लेखात कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक