२१ मार्च या दिवशी पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी देहत्याग केल्यानंतरचा दहावा दिवस आहे. यानिमित्ताने…
नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी १२ मार्च या दिवशी देहत्याग केला. २१ मार्च या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच सनातनचे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी नगर येथील साधकांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
१. ‘साधकांनी प्रतिदिन साधनेचा कालावधी आपल्या दैनंदिन नियोजनाप्रमाणे निश्चित करावा. आपण देवाला दिलेल्या वेळेत नामस्मरणाला बसावे. त्यासाठी साधकांची बैठक पक्की असावी. नामस्मरणाला बसतांना साधकांनी सदैव आसन घ्यावे. ते न घेतल्यास आपली साधना भूमीमध्ये जाऊन नष्ट होऊ शकते.
२. सकाळी नामस्मरणाला बसणे शक्य नसल्यास दिवसभरातील वेळ निश्चित ठरवावी. साधकांनी नामजप करतांना श्वास, तसेच आज्ञाचक्र येथे लक्ष एकाग्र करून नामजप करावा.
३. साधकाच्या जीवनामध्ये मानसपूजेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानसपूजेमुळे आपण श्री गुरु अथवा आपले श्रद्धास्थान यांच्याशी आपण तादात्म्य साधू शकतो. श्रीगुरूंची पूजा करतांना आपल्याला जे काही करता येईल, ते आपण एकाग्रतेने करायला पाहिजे. मानसपूजेला कोणतेच बंधन नसते. ती करतांना आपण आपापल्या भावाप्रमाणे गुरु किंवा देव यांना अनुभवू शकतो. मानसपूजा नित्यनेमाने आणि भावपूर्ण करणे आवश्यक आहे.
४. आपण खाली पडलेले उच्छिष्ट अन्न कधी कधी ग्रहण करतो; पण ते अन्न विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्म शक्तींसाठी असते. त्यामुळे ते अन्न खाऊ नये.’
पू. नेवासकर यांच्या कुटुंबियांना जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. डोळ्यांनी अल्प दिसत असूनही गुरूंवरील श्रद्धेमुळे प्रवास करू शकणे
‘पू. नेवासकरकाकांना जन्मतःच डोळ्यांनी अल्प दिसायचे. त्यांना जास्त क्रमांकाचा चष्मा होता. इतका त्रास असूनही वयाच्या ७९ व्या वर्षीही ते गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर प्रवास करायचे. घरातील साहित्य आणण्यासाठीही एकटेच जायचे.
२. पू. काकांच्या देहत्यागानंतर सर्व कागदपत्रे लगेचच उपलब्ध होणे आणि हे सर्व प.पू. देवेंद्रनाथांच्या कृपेनेच शक्य झाल्याचे जाणवणे
पू. काकांना देहत्यागापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या कोरोनाच्या परिस्थितीत मृत्यूनंतरची कागदपत्रे मिळवण्यासाठी बराच कालावधी लागतो; मात्र आधुनिक वैद्यांनी पू. काकांच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे लगेचच उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुढील प्रक्रिया करणे सहज सोपे झाले. प.पू. देवेंद्रनाथांच्या कृपेनेच हे सहज शक्य झाले, अन्यथा कोरोनासदृश परिस्थितीमध्ये या प्रक्रियेला बराच कालावधी लागतो.
३. पू. काकांचे पार्थिव स्मशानभूमीत नेल्यानंतर त्यांचा मुलगा श्री. सचिन यांना तेथे सूक्ष्मातून प.पू. देवेंद्रनाथांची उपस्थिती जाणवली.’
– पू. नेवासकरकाकांचे कुटुंबीय
सनातनच्या साधकांनी अनुभवलेले पू. (प्रा.) अशोक नेवासकरकाका !
१. कु. प्रतीक्षा कोरगावकर
१ अ. दैनिक सनातन प्रभातविषयी ओढ असणे : ‘पू. नेवासकरकाकांना डोळ्यांनी दिसायला अडचण यायची, तरीही ते पत्नीकडून दैनिक सनातन प्रभात वाचून घ्यायचे. दैनिकातील विषयांवर चर्चाही करायचे.
१ आ. सनातन संस्था, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणे : पू. काकांच्या एका घरगुती कार्यक्रमात मी एकदा गेले होते. तेव्हा पू. काकांनी तेथील कार्यक्रमातही सनातन संस्था, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. अन्य प्रसंगांतसुद्धा ते सनातन संस्थेच्या कार्याचा उल्लेख वेळोवेळी करायचे.’
२. कु. श्वेता पट्टणशेट्टी
२ अ. सनातनच्या साधकांना पाहून आनंदित होणारे पू. नेवासकरकाका ! : ‘पू. काकांशी माझी गेल्या १ वर्षभरात ओळख झाली होती. आम्ही सनातनचे साधक त्यांच्या घरी गेल्यावर पू. काकांना पुष्कळ आनंद व्हायचा. ते आमच्याशी प्रेमाने बोलून आमची चौकशी करायचे.
२ आ. पू. काका आणि त्यांची पत्नी हे दोघेही वयस्कर असून, तसेच त्यांना पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही घरी आलेल्या प्रत्येकाचे ते प्रेमाने स्वागत करायचे.
२ इ. साधनेत प्रेरणादायी मार्गदर्शन करणे : पू. काका आम्हाला साधनेतील अडचणींविषयी मार्गदर्शन करायचे. यावरून साधकांची साधना चांगली व्हावी, अशी त्यांना तळमळ असल्याचे लक्षात यायचे. ते आम्हाला त्यांच्याही विविध अनुभूती सांगून साधनेत प्रेरणा द्यायचे.
२ ई. संत, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी बोलतांना निरागसता असणे : संत, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी त्यांचे भ्रमणभाषवर झालेले बोलणेही पू. काका आम्हाला सांगायचे. त्या वेळी त्यांना पुष्कळ आनंद व्हायचा आणि त्यांच्या सांगण्यात लहान मुलांप्रमाणे निरागसता दिसायची.
२ उ. पू. काकांच्या माध्मातून परात्पर गुरुदेवांनाच भेटल्याचे जाणवणे : पू. काकांच्या घरी जाऊन आल्यावर माझी मरगळ दूर होऊन उत्साह वाटायचा आणि ‘जणूकाही आपण परात्पर गुरुदेवांनाच भेटून आलो’, असे जाणवायचे.
२ ऊ. स्मरणशक्ती चांगली असणे : पू. काका आम्हाला त्यांच्याकडील ग्रंथ वाचायला द्यायचे आणि पुढील वेळी गेल्यावर ‘ग्रंथ वाचले का ?’, हे आवर्जून विचारायचे. अनेक साधकांची नावे, तसेच त्यांची साधना हेही त्यांच्या लक्षात असायचे.
२ ए. कधी कधी साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी ते विभूती द्यायचे.’
३. श्री. रामेश्वर भुकन (पू. नेवासकरकाकांच्या अंत्यविधींच्या वेळी आलेल्या अनुभूती)
३ अ. अंत्यविधींच्या वेळी वातावरण शांत असणे : ‘पू. काकांच्या अंत्यविधीच्या वेळी शांतता जाणवत होती. कुठेही गडबड-गोंधळ वाटत नव्हता. घरात त्यांचे नातेवाईक, भक्त मंडळी, तसेच साधक आलेले होते. वातावरणात निरसता जाणवत नव्हती.
३ आ. ‘पू. काकांनी देहत्याग केलेला नसून ते सर्वांमध्येच आहेत’, असे वाटत होते.
३ इ. अंत्यविधी रात्री ११ ते १२.३० च्या सुमारास झाले. त्या दिवशी अमावास्या असूनही कुठलाही त्रास जाणवत नव्हता.
३ ई. पू. काकांचा तोंडवळा प्रसन्न वाटणे : पू. काकांना स्मशानभूमीत नेण्यापूर्वी हार घातला होता. हार घातल्यानंतर त्यांचा तोंडवळा आणखी प्रसन्न झाला असल्याचे जाणवत होते.
३ उ. पू. काकांचा देह ठेवण्यासाठी सरण रचत असतांना ते सरण नसून जणू काही मऊ गादीप्रमाणे असल्याचेच वाटत होते.
३ ऊ. अग्नीच्या ज्वाळांकडे पहातच रहावेसे वाटणे : साधारण रात्री १२.०५ वाजता अग्नी देण्यात आला. अग्नीच्या ज्वाळा सरळ वरच्या दिशेने जात होत्या. त्यांचा रंग पिवळसर होता. त्यांच्याकडे पहातच रहावेसे वाटत होते.
३ ए. स्मशानभूमीत कोणताही त्रास न होणे : एरव्ही सामान्य व्यक्तीला अग्नी दिल्यावर मला धुराचा त्रास होतो. स्मशानभूमीतही त्रास जाणवतो; पण पू. काकांच्या अंत्यविधींच्या वेळी असे कुठेही जाणवले नाही.
३ ऐ. अग्नी दिल्यानंतर ‘स्मशानभूमीतून निघावे’, असे वाटतच नव्हते. ‘तेथे थांबूया’, असे वाटत होते.
३ ओ. देहत्यागानंतरही पू. काकांनी पुरवलेले चैतन्य अनुभवता येणे : रात्री १ वाजता सर्व आवरून मी घरी पोचलो. त्यानंतरही मला थकवा किंवा कोणताही त्रास जाणवत नव्हता. देहत्यागानंतरही संत किती चैतन्य पुरवतात, हे अनुभवता आले.
प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच पू. नेवासकरकाकांमधील चैतन्यशक्ती आणि संतत्व यांचा मला लाभ झाला, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
|