सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे भ्रमणभाष देयक न भरल्यामुळे बंद !

सरकारी पदाचा गैरवापर करणारे आणि आपल्यामुळे सर्वांची हानी करणारे असे अधिकारी नकोच !

सातारा, १५ मार्च (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने काही वर्षांपूर्वी अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता आयडिया आस्थापनाचे ‘पोस्टपेड कार्ड’ घेण्यात आले होते. त्याच कार्डचा उपयोग सर्व अधिकारी आणि कर्मचारी करत होते; मात्र गत मासात एक अधिकारी निवृत्त झाले. त्यांनी पालिकेने दिलेले ‘कार्ड’ जमा केले नाही. तसेच कार्डचा अतिरिक्त उपयोग करून आयडिया आस्थापनाचे देयक थकवले. यामुळे आयडिया आस्थापनाने सातारा नगरपालिकेचे सर्वच भ्रमणभाष बंद ठेवले आहेत. पालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांनी दैनंदिन उपयोगातील कार्ड बँक, गॅस आदी खात्यांना जोडल्यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या प्रकारामुळे सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची समाजात नाचक्की होत आहे.