सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाशिवरात्र उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

कोरोनामुळे अनेक ठिकाणी भाविकांची संख्या घटली

श्री देव कुणकेश्‍वराच्या यात्रेला प्रारंभ

कुणकेश्‍वर मंदिरात फुलांची आरास केलेली शिवपिंडी

सिंधुदुर्ग – देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वराच्या महाशिवरात्री यात्रेला ११ मार्चपासून प्रारंभ झाला असून १३ मार्चपर्यंत ही यात्रा चालणार आहे. प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात येत आहे. या यात्रेसह जिल्ह्यात, नेरूर, खानोली, तेरवण-मेढे या मंदिरांसह अन्य शिवमंदिरांच्या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव साजरा करण्यात आला; मात्र कोरोनाविषयक नियमांच्या कडक कार्यवाहीमुळे सर्वत्र भाविकांच्या सहभागावर मर्यादा आली.

कुणकेश्‍वर मंदिरात ११ मार्चच्या मध्यरात्री १२ ते २ या वेळेत मंदिराचे पुजारी, गाव यजमान बोंडाळे गावकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर रात्री अडीच वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले; मात्र गावातील ग्रामस्थांची तपासणी करून एका वेळी ३० लोकांना दर्शन घेता येईल, अशी व्यवस्था प्रशासन आणि देवस्थान यांच्या वतीने करण्यात आली होती. विद्युत रोषणाई, तसेच विविध फुलांची आरास करून मंदिर सजवण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.