३२ मण सुवर्ण सिंहासनाला खडा पहारा देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

नंदुरबार – रायगडावर सिद्ध होणार्‍या ३२ मण सुवर्ण सिंहासनास जागता खडा पहारा देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, ‘धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास’ हिंदूंनी पाळावा, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते नंदुरबार येथील सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘बलीदान मास’ प्रत्येक घरात पाळला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ सहस्र धारकर्‍यांची नोंदणी करा. महाराष्ट्र शासन ज्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजना राबवते, त्याप्रमाणे गोमातेसाठीही अनुदान योजना महाराष्ट्र शासनाने राबवावी.’’

या प्रसंगी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा सत्य इतिहास व्याख्यानाच्या माध्यमातून स्वतः पू. गुरुजींनी नंदुरबारकरांना सांगावा’, असा आग्रह धरण्यात आला. त्यावर लवकरच येणार असल्याचे पू. गुरुजी म्हणाले. या वेळी डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, कपिल चौधरी, पंकज डाबी यांसह धारकरी उपस्थित होते.