|
मुंबई, ७ मार्च (वार्ता.) – ५ मार्च या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पटलासमोर महाराष्ट्राचा आर्थिक पहाणी अहवाल मांडण्यात आला. गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाचा फटका महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. देशाप्रमाणेच राज्याच्या अर्थव्यवस्थेतही ८ टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचसमवेत राज्याच्या स्थूल उत्पन्नात १ लाख ५६ सहस्र ९२५ कोटी रुपयांची घट झाली आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न अल्प झाले असून कृषी क्षेत्र सोडल्यास सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. उद्योग क्षेत्रात ११.३ टक्के, तर सेवा क्षेत्रात ९ टक्क्यांची घट झाली असून शासनाने वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संकटकाळातही कृषी क्षेत्रात ११.७ टक्क्यांची वाढ झाली आहे.
वने आणि लाकूड तोडणीमध्ये ५.७ टक्के, मत्स्यव्यवसाय आणि मस्त्य शेतीमध्ये २.६ टक्के आणि पशूसंवर्धात ४.४ टक्के घट झाली आहे. वस्तू निर्माण ११.८ टक्के, तर बांधकाम क्षेत्रांवर १४.६ टक्के घट झाली आहे. कोरोना महामारीचा व्यापार, दुरुस्ती, उपाहारगृह आणि वाहतूक या क्षेत्रांवरही पुष्कळ परिणाम झाला असून सेवा क्षेत्रात ९ टक्क्यांची घट झाली आहे.
वार्षिक कर्ज योजनेअंतर्गत २०२०-२१ मध्ये कृषी आणि संलग्न कार्ये क्षेत्रासाठी वार्षिक लक्ष्य ९३ सहस्र ६२६ कोटी होते. वर्ष २०२०-२१ मध्ये डिसेंबर अखेर वित्तीय संस्थेद्वारे ४० सहस्र ५१५ कोटी रुपये पीक कर्ज वाटप झाले. वर्ष २०१९-२० मध्ये ते २८ सहस्र ६०४ कोटी इतके होते. वर्ष २०२०-२१ मध्ये सप्टेंबरअखेर ३० सहस्र १४ कोटी रुपये कृषी मुदत कर्ज वाटप करण्यात आले, तर वर्ष २०१९-२० मध्ये हे कर्ज ३४ सहस्र ४२७ कोटी रुपयांचे होते.
जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधीत राज्यात अतीवृष्टी आणि पूर यांमुळे शेतपिके अन् फळपिके यांची हानी झाली. पीडित शेतकर्यांना कमाल २ हेक्टर क्षेत्रांतील शेतपिकांसाठी प्रतिहेक्टर १० सहस्र रुपये फळ पिकांसाठी २५ सहस्र रुपये प्रतिहेक्टर या दराने २ हफ्त्यांत ४ सहस्र ३७४ कोटी ४३ लाख रुपयांची हानीभरपाई संमत करण्यात आली.
पहिल्या सुधारित अंदाजानुसार वर्ष २०१९-२० चे सांकेतिक स्थूल उत्पन्न २८ कोटी १८ लाख ५५५ कोटी इतके होते, तर वर्ष २०१८-१९ मध्ये २५ कोटी ७९ लाख ६२८ कोटी होते. वर्ष २०१९-२० मध्ये वास्तविक स्थूल राज्य उत्त्पन्न २१ कोटी ३४ लाख ६५ कोटी होते, तर वर्ष २०१८-१९ मध्ये २० कोटी ३३ लाख ३१४ कोटी होते. वर्ष २०१९-२० मध्ये दरडोई राज्य उत्पन्न २ कोटी २ लाख १३० कोटी होते, तर वर्ष २०१८-१९ मध्ये १ कोटी ८७ लाख १८ कोटी होते.
वर्ष २०२०-२१ चे दरडोई उत्पन्न १ कोटी ८८ लाख ७८४ कोटी अपेक्षित आहे. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ३ कोटी ४७ लाख ४५७ कोटी, तर वर्ष २०१९-२० सुधारित अंदाजानुसार ३ कोटी ९ लाख ८८१ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाज वर्ष २०२०-२१ नुसार कर महसूल आणि करेतर महसूल अनुक्रमे २ कोटी ७३ लाख १८१ कोटी आणि ७४,२७६ कोटी आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ३ कोटी ४७ लाख ४५७ कोटी, तर वर्ष २०१९-२० नुसार ३ कोटी ४७ लाख ४५७ कोटी, तर वर्ष २०१९-२० सुधारित अंदाजानुसार ३ कोटी ९ लाख ८८१ कोटी आहे.