मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – सामाजिक माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एका तृतीय पंथियासमवेत अनैतिक संबंध असल्याची पोस्ट प्रकाशित करणार्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका व्यक्तीविरोधात कारवाई करण्याचा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ४ मार्च या दिवशी विधानसभेत दिला. गेल्या काही दिवसांपासून ही पोस्ट सामाजिक माध्यमांवर फिरत आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाली होती; मात्र विधानसभेत राजकीय नेत्यांवर खोट्या पोस्ट करणार्या व्यक्तींवर कारवाई केली गेली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी प्रकाशित होत असलेल्या पोस्टच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
आरोप करणार्या पुण्यातील व्यक्तीला अटक
पुणे, ६ मार्च – माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तृतीयपंथी व्यक्तीस खोटे आश्वासन देऊन त्याच्याशी समलैंगिक संबंध ठेवले असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील युवराज दाखले या व्यक्तीने एका व्हिडिओतून केला होता. फडणवीसांविषयी आरोप करणार्या युवराज दाखले याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाखले याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.