विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
यवतमाळ – अभियंता किंवा आधुनिक वैद्य किंवा पदवीधर होऊन विदेशात पैसा कमावणे असे ध्येय ठेवण्यापेक्षा आता स्वरक्षणाचे ध्येय ठेवले पाहिजे, अशी अत्यावश्यकता निर्माण झाली आहे. जिथे सुरक्षा यंत्रणाच धोक्यात आल्या आहेत, तिथे सामान्य व्यक्तीचे काय रक्षण होणार ? म्हणून आपण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सुसज्ज होऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध राहिले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यानात उपस्थित युवक-युवतींना केले. २७ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या या शौर्यजागृती व्याख्यानात पुष्कळ युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
व्याख्यानात श्री. प्रथमेश गावंडे यांनी स्वरक्षणाची काही प्रात्यक्षिके ‘ऑनलाईन’ करून दाखवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी ददगाळ यांनी केले. उपस्थित अनेक युवक-युवतींनी ‘स्वरक्षण प्रशिक्षण हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि अत्यावश्यक असून प्रत्येक हिंदु युवक-युवतीने हे प्रशिक्षण घेणे काळाची आवश्यकता आहे’, असे सांगितले. उपस्थितांनी राष्ट्र-धर्म रक्षणार्थ स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणीही केली आहे.