मुंबई येथील सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर संत आणि साधक यांना आलेल्या अनुभूती

भाग १.

पू. (सौ.) संगीता जाधव

१. पू. (सौ.) संगीता जाधव यांना आलेल्या अनुभूती

१ अ. गुरुपादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर सेवाकेंद्रातील प्रत्येक वस्तूत जिवंतपणा जाणवणे : ‘मुंबई येथील सेवाकेंद्रात श्री गुरुपादुकांची प्रतिष्ठापना झाली. त्यानंतर वास्तूतील प्रत्येक वस्तू मला प्रकाशमान वाटत होती. ‘सेवाकेंद्रातील सर्व वस्तू, पडदे, आसंदी, संगणक आणि खिडक्या बोलत आहेत’, असे मला वाटत होते. स्वयंपाकघरातील भांड्यांना वेगळीच चकाकी आली होती आणि ‘प्रत्येक भांडे काहीतरी बोलू पहात आहे’, असे मला वाटले. प्रत्येक वस्तू ‘आम्ही गुरूंच्या चरणांची सेवा करून कसे कृतकृत्य झालो’, असे सांगत असल्याचे जाणवले.

१ आ. श्री गुरुपादुकांचा प्रकाश दूरपर्यंत पसरत असल्याचे जाणवणे : मी डोळे बंद केल्यावर ‘श्री गुरुपादुकांचा प्रकाश दूरपर्यंत जात आहे’, असे मला जाणवते. ‘इमारतीच्या बाहेरही प्रकाशाचे वलय निर्माण झाले आहे’, असे मला वाटते.

श्री गुरुपादुकांकडे पाहून नामजप करतांना ‘कधी पांढरा, तर कधी निळा प्रकाश संथपणे दूरवर पसरत आहे’, असे वाटते. ध्यानमंदिरात पिवळा, गुलाबी आणि निळा अशा वेगवेगळ्या रंगांचा प्रकाश अनुभवायला मिळतो.

१ इ. ‘गुरुपादुका सर्वांचे रक्षण करत आहेत’, असे जाणवणे : ‘सेवाकेंद्रात गुरुपादुकांमुळे देवीदेवता उपस्थित आहेत’, असे मला जाणवते. ‘गुरुपादुकांकडे बघतांना त्यांतून प्रकाशाचा गोळा बाहेर येत आहे आणि त्या गोळ्याचे त्रिशूळ, सुदर्शनचक्र या शस्त्रांत रूपांतर होऊन कुठेतरी सूक्ष्म युद्ध चालू आहे अन् गुरुपादुकांचे निर्गुण कार्य चालू आहे’, असे जाणवते. त्यामुळे ‘गुरुपादुका सर्वांचे रक्षण करत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

१ ई. ‘गुरुपादुकांत ३३ कोटी देवांचे सामर्थ्य आहे’, असे जाणवणे : मला वाटते, ‘श्री गुरुपादुकाच सर्व कार्य करत आहेत. आपण केवळ देहाने आहोत. ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहामुळे ओंडका पुढे पुढे ढकलला जातो, त्याप्रमाणे गुरुपादुकांच्या चैतन्याच्या प्रवाहामुळे व्यक्ती पुढे पुढे जात आहे. गुरुपादुकांमध्ये ३३ कोटी देवांचे सामर्थ्य आहे आणि उर्वरित जग केवळ शून्य आहे.’ ‘गुरुपादुका तरंगत आहेत’, असे स्थुलातूनही मला जाणवते.

१ उ. श्री गुरुपादुकांसमोर काही क्षण बसले, तरी मन आणि बुद्धी यांवरील आवरण नाहीसे होते, जडपणा नष्ट झाल्याचे जाणवते, तसेच पूर्ण शरिरात हलकेपणा जाणवतो.

१ ऊ. साधकांचा काळवंडलेला तोंडवळा ध्यानमंदिरात बसून जप केल्यावर उजळलेला दिसणे आणि त्यांच्या मनातील विचारांत पालट जाणवणे : प्रसारातून साधक सेवाकेंद्रात येतात. तेव्हा ते थकलेले असतात. त्यांच्यावर पुष्कळ आवरण आलेले असते. त्यांचा तोंडवळा काळवंडलेला असतो. त्या साधकांनी ध्यानमंदिरात बसून १५ मिनिटे किंवा अर्धा घंटा नामजप केल्यावर त्यांचा तोंडवळा उजळलेला दिसतो. त्यांना त्यांच्या मनातील विचारांत पालट जाणवतात.

१ ए. साधकांना एखादी समस्या मोठी वाटत असते आणि त्यांनी ध्यानमंदिरात बसून नामजप केल्यावर त्यांना ती समस्या साधारण वाटते. भयावह वाटणार्‍या गोष्टी क्षुल्लक वाटतात.

१ ऐ. साधकांचा भाव अल्प असला, तरी त्यांना गुरुपादुकांमधून पुष्कळ चैतन्य मिळते.

१ ओ. इतर वेळी भावजागृतीचे प्रयत्न करावे लागतात; परंतु श्री गुरुपादुकांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की, त्यांच्याकडे काही क्षण बघितले, तरी भावजागृती होते.’

२. सेवाकेंद्रातील साधक

२ अ. गुरुपादुका सूक्ष्मातून शरिराच्या विविध भागांवर ठेवून नामजप केल्यावर आलेल्या अनुभूती

२ अ १. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी सांगितल्यानुसार गुरुपादुका हृदयात किंवा डोक्यावर सूक्ष्मातून ठेवून नामजप केल्यावर दिवसभर आनंद जाणवणे : ‘एकदा मी सेवाकेंद्रात आले होते. त्या वेळी पू. (सौ.) संगीता जाधव एका साधिकेला गुरुपादुकांच्या दर्शनाचे महत्त्व सांगत होत्या आणि त्यांनी त्या साधिकेला ‘गुरुपादुका हृदयात किंवा डोक्यावर ठेवल्या आहेत’, असा भाव ठेवून नामजप करण्यास सांगितला. ते ऐकल्यावर मीही दिवसभर तसेच प्रयत्न केले. त्यामुळे माझाही नामजप मनापासून होत होता आणि मला दिवसभर आनंद जाणवत होता.’ – सौ. अनिता वागराळकर, मुंबई

२ अ २. ‘गुरुपादुका मस्तकावर आहेत’, असा भाव ठेवून नामजप केल्यावर ‘अनाहतचक्रातून काहीतरी खाली ढकलले जात आहे’, असे जाणवणे, अनाहतचक्रावरील वेदना थांबणे आणि शरिरात थंडावा जाणवणे : ‘ध्यानमंदिरात नामजपाला बसल्यावर माझे मन एकाग्र होत नव्हते आणि अनाहतचक्रावर त्रास होत होता. तेव्हा मी गुरुपादुकांचे स्मरण केले आणि ‘गुरुपादुका मस्तकावर आहेत’, असा भाव ठेवला. ‘त्यानंतर गुरुपादुका सूक्ष्मातून माझ्या सहस्रारचक्रातून शरिरात प्रवेश करत आहेत आणि अनाहतचक्रातून काहीतरी खाली ढकलले जात आहे’, असे मला वाटले. मनातील विचारांचा सर्व दाब खाली गेल्याचे जाणवले आणि अनाहतचक्रावरील वेदना थांबल्या. त्या वेळी संपूर्ण शरिरात थंडावा जाणवत होता.’ – सौ. चारुलता नखाते, मुंबई

(क्रमशः उद्याच्या अंकात)

भाग २.वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिककरा – https://sanatanprabhat.org/marathi/455971.html 

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक