बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ होतांना झालेला त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘११.११.२०१९ या दिवशी आम्ही (तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे चार साधक) बेलगुरु, कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात गेलो होतो. तेव्हा त्यांनी ‘तुमच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘नवचंडी याग’ करूया’, असे सांगितले. १२.११.२०१९ या दिवशी सकाळी ९.३० वाजता स्वामीजींच्या आश्रमातील पुरोहित साधकांनी ‘नवचंडी याग’ केला. त्यांनी आम्हा चार साधकांना आणि सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्ते श्री. निषाद देशमुख यांना यज्ञस्थळी नामजप करण्यासाठी बसायला सांगितले.

कर्नाटक येथील संत श्री बिंदू माधव शर्मा

१. यज्ञाच्या वेळी साधकाला झालेला आध्यात्मिक त्रास आणि आलेल्या अनुभूती

१ अ. यज्ञ चालू असतांना आरंभी अस्वस्थ वाटणे आणि ‘यज्ञस्थळाहून दूर जाऊन झोपूया’, असे वाटणे : ‘मला यज्ञ चालू झाल्यावर ३० मिनिटांनी त्रास चालू झाला. तेव्हा माझे पाय आणि पाठ पुष्कळ दुखत होती. माझ्या हाता-पायांना कंप सुटला. माझ्या डोळ्यांतून पाणी वहात होते. मला अस्वस्थ वाटत होते आणि ती अस्वस्थता वाढतच होती. मला तिथे बसता येत नव्हते. ‘इथून उठून जाऊया आणि झोपूया’, असे मला वाटत होते; म्हणून मी श्री. निषाद देशमुख यांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला त्रासाशी लढायला आणि देवीला भावपूर्ण प्रार्थना करायला सांगितली.

आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया

१ आ. प्रार्थना आणि नामजप केल्यावर त्रास नाहीसा होऊन यज्ञातील चैतन्य अनुभवणे : त्यांच्या सांगण्यानुसार मी देवीला प्रार्थना केली आणि माझा ‘राम, राम, राम, राम’, हा नामजप अखंड चालू झाला. मी प्रार्थना आणि नामजप चालू केल्यावर १० मिनिटांनी मला होत असलेले त्रास न्यून झाले आणि ३० मिनिटांनंतर त्रास नाहीसे झाले. नंतर मला उत्साह वाटू लागला आणि मला यज्ञातील चैतन्य अनुभवता आले.

१ इ. यज्ञानंतर घेतलेल्या साधकाच्या ‘यू.ए.एस्.’ रिडींगमध्ये साधकातील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन त्याच्या सकारात्मक स्पंदनात वाढ झाली’, असे आढळणे : यज्ञ चालू होण्यापूर्वी माझे ‘यू.ए.एस्.’ रिडींग घेतल्यावर ‘माझ्यात नकारात्मक स्पंदने अधिक होती आणि सकारात्मक स्पंदने नव्हती’, असे आढळले. यज्ञ झाल्यानंतर माझे ‘यू.ए.एस्.’ रिडींग घेतल्यावर ‘माझ्यातील नकारात्मक स्पंदने नाहीशी झाली आणि सकारात्मक स्पंदनात वाढ झाली’, असे आढळले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘यज्ञामुळे मला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास झाला आणि त्रास बाहेर पडल्यावर मला चांगले वाटू लागले. त्या वेळी त्रास बाहेर पडल्यावर वैज्ञानिक चाचणीत माझ्यातील नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन सकारात्मक स्पंदनात वाढ झाली असल्याचे लक्षात आले.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

२. संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या आश्रमात जातांना आणि रामनाथी आश्रमात परत आल्यावर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप अखंड चालू असणे अन् निर्विचार स्थिती अनुभवणे

संत श्री बिंदू माधव शर्मा हे हनुमान भक्त आहेत. त्यांचे एक हनुमानाचे मंदिर आहे. त्यांच्या आश्रमात जातांना प्रवासात मला श्रीरामाचे स्मरण होत होते. ११.११.२०१९ या दिवशी आम्ही त्यांना भेटल्यावर त्यांनी ‘आपल्याला रामनामच तारणार आहे’, असे सांगितले. त्यानंतर माझा ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा नामजप अखंड चालू झाला. प्रत्येक कृती करतांना ‘माझा नामजप चालू आहे’, असे मला जाणवत होते. मला मध्यरात्री जाग आल्यावरही ‘माझा नामजप चालू आहे’, असे मला जाणवले. मी त्यांच्या आश्रमात दोन दिवस होतो. तेव्हा माझा रामाचा नामजप चालू होता आणि मी रामनाथी आश्रमात आल्यावरही माझा हा जप २ दिवस अखंड चालू होता. त्या नामजपामुळे मला शांत, आनंदी आणि उत्साही वाटत होते अन् माझे मन निर्विचार झाले होते.

३. कृतज्ञता

भगवान श्रीराम आणि संत श्री बिंदू माधव शर्मा यांच्या कृपेमुळे माझा रामनामाचा नामजप अखंड चालू होता आणि मी आनंद, चैतन्य अन् निर्विचार स्थिती अनुभवत होतो. मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी मला हे अनुभवायची संधी दिली’, त्याविषयी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– डॉ. उज्ज्वल कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.११.२०१९)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक